उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे असणाऱ्या एका प्रतिष्ठीत कॉलेजच्या नावाने सध्या सोशल नेटवर्किंगवर एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये कॉलजेचं नाव आणि लोगो असणाऱ्या नोटीसमध्ये सर्व विद्यार्थ्यांनींना १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाइन्स डेच्या आधी प्रियकर असावा असं नमूद करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणामुळे प्रत्येक विद्यार्थीला एक प्रियकर असावं तसेच असं नसेल तर विद्यार्थींना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार नाही असं या व्हायरल नोटीसमध्ये म्हटलं आहे. मात्र आता यासंदर्भात कॉलेजच्या मुख्यध्यापकांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

कोणतं कॉलेज आहे हे?

आग्रा येथील सेंट जॉन्स कॉलेजच्या लेटर हेड असणाऱ्या पत्रकावरील मजकूर सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. या नोटीसवर कॉलचे सहाय्यक डीन असणाऱ्या प्राध्यापक अशिष शर्मा यांची स्वाक्षरी असल्याचंही दिसत आहे. आग्रा येथील सर्वात जुन्या शैक्षिणक संस्थांपैकी एक असणाऱ्या सेंट जॉन्सच्या नावाने हे पत्रक फिरत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हे कॉलेज १८५० मध्ये ब्रिटीशांनी बांधलं असून कॉलेजला दीडशे वर्षांहून अधिक मोठी शैक्षणिक परंपरा आहे.

व्हायरल पत्रकामध्ये काय आहे?

व्हायरल झालेल्या नोटीसवर १४ जानेवारी २०२१ अशी तारीख आहे. “१४ फेब्रुवारीपर्यंत कॉलेजमधील सर्व मुलींना किमान एक प्रियकर असणे बंधनकारक करण्यात आलंलं आहे. मुलींच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. मुलींना एकट्याने कॉलेजच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. मुलींना त्यांच्या प्रियकरासोबतचा फोटो पाहिल्यावरच कॉलेजमध्ये प्रवेशाची परवानगी दिली जाईल,” असं या व्हायरल नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

मुलींना यासंदर्भात समजलं तेव्हा…

कॉलेजची ही नोटीस व्हायरल झाल्याने अनेक विद्यार्थीनी गोंधळात पडल्या आहेत. “आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून या नोटीससंदर्भात समजलं. त्यानंतर या विषयावर आमच्यात भरपूर चर्चा झाली.  कॉलेज प्रशासनाकडून अशाप्रकारची नोटीस कशी दिली जाऊ शकते?,” अशी प्रतिक्रिया या नोटीससंदर्भात बोलताना एका संतापलेल्या विद्यार्थीने व्यक्त केली.

पालक घेऊन विद्यार्थीनी कॉलेजमध्ये

ही नोटीस व्हायरल झाल्यानंतर मुलींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं. काही मुली तर थेट आपल्या पालकांना घेऊन कॉलेजमध्ये आल्या. पालकांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर या मुलींनी या नोटीससंदर्भात कॉलेज प्रशासनाकडे चौकशी केली असता कॉलेजने अशी कोणताही नोटीस काढली नसल्याचं स्पष्ट केलं.

अखेर मुख्यध्यापकांनी दिलं स्पष्टीकरण

हे प्रकरण एवढं वाढलं की अखेर कॉलेजचे मुख्याध्यापक प्राध्यापक एस. पी. सिंग यांनी सोमवारी या व्हायरल नोटीसंसदर्भात एक पत्रक जारी केलं. यामध्ये त्यांनी ही नोटीस खोटी असल्याचं म्हटलं आहे. “कॉलेज प्रशासनाच्या नावाने काही जणांनी खोटी माहिती पसरवणारं पत्रक व्हायरल केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. कॉलेजचं नाव खराब करण्याच्या हेतून हे केलं जात असल्याची शक्यता असून ती नोटीस पूर्णपणे खोटी आहे,” असं या पत्रकामध्ये मुख्यध्यापकांनी म्हटलं आहे.

आमच्याकडे त्या नावाचे प्राध्यापकच नाहीत

ही माहिती अधिकृत नसून विद्यार्थ्यांनी त्याकडे दूर्लक्ष करावं. ही नोटीस कोणी व्हायरल केली आणि यासाठी कोण जबाबदार आहे याबद्दल कॉलेज प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे, असंही सिंग यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यध्यापकांनी आमच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक आशिष शर्मा नावाने कोणताही शिक्षक नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.