करोना व्हायरस महामारीचा परिणाम जगभरातील अनेक कंपन्यांवर झाला असून लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्यात. परिस्थिती कधीपर्यंत पूर्वपदावर येईल याबाबत कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. अशात आता नोकरीपेक्षा बिझनेसकडे बहुतांश लोकांचा कल असल्याचं दिसून येत आहे. कारण, गुगलवर गेल्या आठवड्यात लोकांनी बिझनेस कसा सुरू करावा याबाबतच सर्वाधिक सर्च केल्याचं समोर येतंय.

गेल्या आठवड्यात गुगलवर how to start a business बाबत लोकांनी विक्रमी संख्येने सर्च केलं. गुगलने जारी केलेल्या गेल्या आठवड्यातील ट्रेंड्सवरुन ही बाब समोर आलीये. सर्वाधिच सर्च कपड्यांचा व्यापार, ट्रकिंग, ड्रॉपशीपिंग, क्लिनिंग, टी-शर्ट आणि फोटोग्राफी बिजनेस कसा सुरू करायचा याबाबत होत आहे. याशिवाय छोट्या व्यवसायांबाबतही मोठ्या प्रमाणात सर्चिंग झालं. तसंच, कृष्णवर्णीय, महिला आणि अल्पसंख्यांकांच्या बिझनेसला कशाप्रकारे मदत करता येईल याबाबतही अनेक जणांनी सर्च केलं. जगभरातून गेल्या ९० दिवसांमध्ये स्थानिकांना पाठिंबा म्हणजे ‘सपोर्ट लोकल’ या की-वर्डबाबतही मोठ्या प्रमाणात सर्चिंग झालं.

गुगलवर लोकं लहान-मोठ्या बिझनेसबाबत सर्च करत आहेत. कपड्यांच्या व्यवसायाबाबत भारताव्यतिरिक्त जगभरातील अनेक ठिकाणांहून सर्च होत आहे. याशिवाय दागिन्यांच्या बिझनेसबाबतही युजर्स सर्च करतायेत. तर, अमेरिकेत जॉर्ज फ्लोयड मृत्यूप्रकरणानंतर गुगलवर Black owned businesses near me या की-वर्डच्या सर्चमध्ये 3,750 टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय. याशिवाय, minority owned businesses की-वर्ड सर्चमध्ये गेल्या 10 वर्षांचा रेकॉर्ड तुटला. तर, women owned businesses बाबतही अमेरिका आणि अन्य देशांमध्ये सर्चिंगच्या प्रमाणात वाढ झाली. तसेच, गेल्या 90 दिवसांमध्ये support local कीवर्डच्या सर्चमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. support local restaurants बाबत सर्चमध्ये 2020 वर्षात तब्बल 5,000 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. ट्रेंड रिपोर्टनुसार लोकं आपल्या परिसरातील स्थानिक बिझनेसला सपोर्ट करु इच्छितात हे समोर आलंय. एकूणच आता नोकरीपेक्षा बिझनेसकडे नागरिकांचं प्राधान्य असल्याचं अधोरेखीत झालं असून गुगल सर्च ट्रेंडच्या रिपोर्टनुसार करोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर बिझनेस सुरू करण्याकडे लोकांचा कल वाढलाय.