नशिबाचे दार कधी उघडतील काही सांगता येत नाही, असंच काहीसं झालं दुबईत राहणाऱ्या एका भारतीय कामगारासोबत. डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे त्यांचं जगणं मुश्किल झालं होतं. पण ऐनवेळी नशिबाचं दार उघडलं आणि तो रातोरात कोट्यधीश झाला. दुबईत बांधकाम ठिकाणी काम करणारा कृष्णम राजू थोकाचीचू याने दुबईत ‘बिग ५ तिकीट ड्रॉ’ अंतर्गत साडे आठ कोटींहून अधिक रुपयांची लॉटरी जिंकली.

नुकतंच अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात कृष्णम यांनी ही रक्कम जिंकली आहे. ‘गल्फ न्यूज’ने यासंबधीचे वृत्त दिले आहे. कधी ना कधी आपण श्रीमंत होऊ या अपेक्षेने कृष्णम नेहमीच आपल्या मित्रांसोबत मिळून लॉटरीचे तिकीट खरेदी करत होते पण त्यांना कधीच लॉटरी लागली नाही. पगार झाला की आपण लॉटरीच्या तिकीटासाठी नेहमीच पैसे बाजूला काढून ठेवायचो पण तीन वर्षांत कधीच लॉटरी लागली नाही, पण यावेळी मात्र नशिब आजमवण्यासाठी आपण मित्रांऐवजी एकट्यानं लॉटरीचं तिकीट खरेदी करण्याचं ठरवलं आणि आश्चर्य म्हणजे त्याला लॉटरी लागली देखील. या पैशातून आपण कर्ज फेडू तसेच उर्वरित रक्कम चार वर्षांच्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करू असंही त्यानं सांगितलं.