सामान्यपणे एखाद्या जुन्या आणि वापरता नसणाऱ्या गोष्टींकडे दूर्लक्ष केलं जातं. तसेच त्या गोष्टीकडे कोणी लक्ष दिलं तर ती गोष्ट हद्दपार करण्यासाठी आणि त्याजागी नवीन उपयोगाची गोष्ट उभारण्याला प्राधान्य दिलं जातं. मात्र जगात असे काही कलाकार आहेत जे जुन्या आणि वापरात नसणाऱ्या गोष्टींना त्यांच्या नजरेतून नव्याने लोकांसमोर आणतात. असेच काहीसे झालं आहे तामिळनाडूमधील उटीमध्ये. पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या उटीमध्ये संधी दिल्यास कलाकार काय करु शकतो याचं उत्तम उदाहरण समोर आलं आहे. शहरामध्ये सार्वजनिक शौचालय (टॉयलेट) म्हणून बांधण्यात आलेली इमारत कोणीही वापरत नव्हतं. त्यामुळेच काही कलाकारांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आर्ट गॅलरी सुरु करण्यासाठी हलचाली केल्या आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. सध्या या गॅलरीमध्ये लोकांची तुफान गर्दी होताना दिसत आहे. या वेगळ्या रुपात समोर आलेल्या सार्वजनिक शौचालयाची आर्ट गॅलरी कशी झाली यासंदर्भातील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

उटीतील हा चमत्कार करुन दाखवला आहे काही कलाकारांनी. आयएएस अधिकारी अशणाऱ्या सुप्रिया साहू यांनी ट्विटवरुन यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. “एक वापरात नसणाऱ्या शौचालयाच्या इमारतीलाच आर्ट एक्झिबिशन सेंटर म्हणून वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली. या आर्ट गॅलरीचे नाव द गॅलरी वन टू असं ठेवण्यात आलं आहे. नगरपालिकेने येथून जवळच नवीन सार्वजनिक शौचालक उभारलं असल्याने या इमारतीमध्ये आर्ट गॅलरी सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली,” असं साहू यांनी व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या आर्ट गॅलरीमध्ये एक छोटं ग्रंथालयही सुरु करण्यात आलं आहे. हे ग्रंथालय स्थानिकांसाठी मोफत सेवा देणार आहे. येथे बसून स्थानिकांना निवांतपणे पुस्तके वाचता येणार आहेत. आर. मणिवन्नम या कलाकाराने पुढाकार घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात आणलीय. या आर्ट गॅलरीत मणिवन्नम यांचीही काही चित्र लावण्यात आली आहेत. लोक सध्या या आर्ट गॅलरीला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे. मात्र एका शौचालयाच्या इमारतीपासून थेट आर्ट गॅलरीपर्यंतचा या इमारतीचा प्रवास सोशल नेटवर्कींगवर चर्चेचा विषय ठरतोय.