चहाविक्रेता म्हटल्यावर त्याचे उत्पन्न ते किती असणार असा साहजिकच प्रश्न आपल्याला पडतो. पण केरळमधील एका ७० वर्षीय दाम्पत्याने आपला चहाचा व्यवसाय सांभाळत एक दोन नाही तर तब्बल २० देश पालथे घातले आहेत. आपले जग फिरायचे स्वप्न हे दाम्पत्य आपले काम प्रामाणिकपणे करत पूर्ण करत आहेत. केरळमधील विजयन आणि मोहना यांची ही कहाणी सर्वांनाच प्रेरणादायी अशी आहे. जगभरातील अनेक जण त्यांचे फॅन झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या फॅन लिस्टमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा हेही आहेत. या दोघांचा एक व्हिडियो शेअर करत महिंद्रा एका पोस्टद्वारे त्यांचे कौतुक करतात.

ते म्हणतात, हे दोघे फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत नसतील. पण माझ्यादृष्टीने ते देशातील श्रीमंतांच्या यादीत नक्की आहेत. आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन हीच त्यांची खरी संपत्ती आहे. मी जेव्हा त्यांच्या गावी जाईन तेव्हा नक्कीच त्यांची भेट घईन असेही महिंद्रा आवर्जून सांगतात. अशापद्धतीने आपले आयुष्य अतिशय वेगळ्या आणि उत्तमपद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना महिंद्रा कायम प्रोत्साहन देत असल्याचे आपल्याला दिसते. ते सोशल मीडियावरही भलतेच अॅक्टीव्ह असतात. कधी कोणाला मदतीचा हात देत तर कधी एखाद्याचे जाहीर कौतुक करत ते आपले सामाजिक भान दाखवून देतात. महिंद्रा यांनी ट्विट केलेला या दाम्पत्याचा व्हिडियो लाखो जणांनी पाहिला असून त्यावर असंख्य जणांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. जवळपास अडिच मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये या दाम्पत्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे.