महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टीव्ह असतात. कधी कोणाला मदतीचा हात देऊन तर कधी एखाद्या अगदी सामान्य गोष्टीवर ते ट्विटद्वारे व्यक्त होताना दिसतात. त्यांच्या या ट्विटसची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चाही होताना दिसते. आता नुकताच आनंद महिंद्रांनी एक व्हिडियो ट्विट केला आहे. यामध्ये बाईक स्टंट करताना एकाचा वाईट पद्धतीने अपघात झाल्याचे या व्हिडियोमध्ये दिसत आहे. यामध्ये या बाईक रायडरचा प्रयत्न अयशस्वी होतो आणि तो जोरात खाली पडतो. मात्र तो पुन्हा आपली पोझ घेतो आणि स्पर्धा पूर्ण करतो. अजिबात न घाबरता स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रायडरची जिद्द ही खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगी आहे असे महिंद्रा आपल्या ट्विटमधून सांगतात.

आपण या स्टंटचा व्हिडियो पोस्ट केल्यापासून आपल्या इनबॉक्समध्ये लोकांकडून विविध स्टंटचे व्हिडिओ भरभरून येऊ लागले आहेत असेही ते ट्विटमध्ये म्हणतात. पण आपण टाकलेला हा व्हिडिओ जरा खास आहे. कारण यामध्ये बाईक रायडर पडत असूनही त्याच्या चेहऱ्यावर अजिबात भीती दिसून येत नाही. इतकेच नाही तर तो स्वत:ला सावरून पुन्हा बाईकवर बसतो. त्यामुळे हे नक्कीच प्रेरणादायी आहे. आपल्याला आलेल्या अपयशातून पुन्हा नव्याने, जोमाने उभे राहण्याच्या या जिद्दीला सलाम. या प्रेरणादायी गोष्टीसाठी धन्यवाद असेही ते शेवटी म्हणतात.

याआधीही काही दिवसांपूर्वी महिंद्रांनी एका कलाकाराचा व्हिडियो पोस्ट केला होता. सफरचंद आणि पानावर व्यक्तींचे चेहरे काढणारा परदेशातील हा व्हिडियो त्यांनी ट्विट केला होता. त्यावर त्यांनी भारतात कोणाकडे अशी कला असल्यास संपर्क साधा असे म्हटल्यानंतर एका भारतीय तरुणाने त्यांना आपण करत असलेल्या खडूवरील कलांचा व्हिडियो टाकून टॅग केले होते. मग त्यांनी या मुलाचे कौतुक करत त्याला तुझी काही वेबसाइट आहे का असा प्रश्नही विचारला होता. त्यामुळे समाजातील सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींचे कौतुक करणाऱ्या आणि निराशेत असलेल्या लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या महिंद्रांचे खऱ्या अर्थाने कौतुक आहे.