सोशल मीडियाचा जसा फायदा आहे तसा तोटाही आहे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता इथे अनेक अफवा वाऱ्यासारख्या पसरतात. कधी कधी या अफवा आहे किंवा फेक मेसेज हेही लक्षात येत नाही. मागे नाही का इंडोनेशियातल्या एका अस्वलाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावर हा फोटो केरळ कर्नाटकच्या सीमेवरील एलिअनचा असून, हे एलिअन माणसांना खात आहे असेही लिहिले होते. तेव्हा बिचारे गावकरी किती घाबरले होते. फेक मेसेज व्हायरल होण्याचे अशी एकच नाही तर असंख्य उदाहरणं असतील. आता दोन तीन दिवसांपासून आणखी एक मेसेज व्हायरल होतोय. ‘७७७८८८९९९ क्रमांकावरून आलेला फोन उचलू नका’ असा तो संदेश आहे.

व्हॉट्सअॅप, फेसबुकवर हे मेसेज फिरतो आहे. बरं हा फोन न उचलण्याचे कारणही तसं भयंकर. या क्रमांकावरून आलेला फोन उचलला तर मोबाईलचा स्फोट होईल, अशी कारण दिली आहेत. पण या मेसेजमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून, हा फक्त फेक मेसेज आहे. मुळात भारतात कोणताही फोन क्रमांक हा १० डिजिटचा असतो आणि हा फोन क्रमांक नीट पाहिला तर तो ९ डिजिटचा आहे तेव्हा फोन वगैरे फुटण्याचे जे काही मेसेज येत आहेत त्या केवळ अफवाच आहेत.