कडाक्याच्या उन्हामुळे सर्वजण त्रस्त आहे. त्यापासून वाचण्यासाठी एसी, कूलर, फॅनचा वापर सर्वजणच करतात. पण, या रखरखत्या उन्हापासून वाचण्यासाठी गुजरातमधील अहमदाबादच्या एका महिलेनं अनोखी शक्कल लढवली आहे. त्या महिलेनं आपल्या संपूर्ण कारला चक्क शेणाने सारवले आहे. सोशल मीडियावर या कारचा फोटो व्हायरल होत आहे.

रूपेश दास नावाच्या एका व्यक्तीनं याचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. त्यासोबत कॅप्शनमध्ये तो म्हणतो की, शेणाचा सर्वात चांगला वापर मी अहमदाबादमध्ये पाहिला आहे. सेजल शाह या महिलेनं ४५ डिग्री तापमानापासून कारला वाचण्यासाठी चक्क शेणानं सारवले आहे.

रूपेश दासने कारचे दोन फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. ग्रामीण भागांमध्ये शेणाचा वापर घरापुढे सडा टाकण्यासाठी किंवा सारवण्यासाठी केला जातो. मात्र, सेजल शाह या महिलेनं चक्क कारला शेणानं सारवले आहे. सोशल मीडियावर हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये या कारची पासिंग मुंबईमधील असल्याचे दिसते. गाडीचा क्रमांक एम.एच ०१, एआय ६२६७ असा आहे.