एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हटले की अनेकांना अनिल कपूरचा नायक चित्रपट डोळ्यासमोर येतो. नायक चित्रपटाला साजेशा कथनकाप्रमाणेच बीडमधील एका सुशिक्षित बेरोजगार तरूणाने एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी त्याने थेट राज्यपालांना पत्रही लिहले आहे.

श्रीकांत विष्णू गदळे (वय ३५ वर्ष) असं त्या तरूणाचे नाव असून तो बीडमधील देवगाव दहिफळ इथला रहिवासी आहे. श्रीकांत विष्णू गदळे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ते राज्यापालांना पत्र लिहल्यापासून मुख्यमंत्री होण्यामागील कारणही सांगत आहेत.

शेतकरी, व्यापारी कष्टकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेऊन न्याय देतो असं पत्रात श्रीकांत गदळे यांनी नमूद केलं आहे. सध्या या तरुणाची बीडमध्ये सगळीकडे चर्चा आहे. मुख्यमंत्रीपदाचं खूळ डोक्यात असलेल्या श्रीकांत गदळे यांनी बीड ते लालबागचा राजा (मुंबई)पर्यंतचा प्रवास पायी केला आहे. बुधवारी त्याने लालबागच्या राजाचे दर्शनही घेतलं. यावेळी श्रीकांत यांनी ‘एक दिवसाचा मुख्यमंत्री होऊ दे’ असं साकडे लालबागच्या राजाला घातलं आहे.

दरम्यान, २०१६ मध्ये श्रीकांतने लालबागच्या राजाकडे एक दिवसाचा मुख्यमंत्री बनन्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी नवस केला होता. नवस करताना नारळ उभा फुटल्याने आपलं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास श्रीकांतला आहे.