बिहारमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगूल वाजलं असून उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करण्यास सुरूवात केली आहे. या काळात उमेदवार वेगवेगळे फंडे वापरत प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करत असतात. निवडणूकीच्या काळात चर्चेत येण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. एक उमेदवार तर चक्क म्हशीवरूनच मिरवणूक काढली. म्हशीवर स्वार होत हा उमेदवार जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांसमोर हजर झाला तेव्हा त्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. या उमेदवाराचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहेत. यामुळे या उमेदवाराचा जोरदार प्रचार झाल्याची चर्चा राज्यात रंगली आहे.

बिहारमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणूकींचं वातावरण रंगलंय. कुणी अर्ज भरण्यासाठी हजारोंची गर्दी घेऊन जात आहे, तर कुणी हटके स्टाईल अवलंबताना दिसतो आहे. कटिहार जिल्ह्यातील रामपूरचे उमेदवार आझाद आलम हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी म्हशीच्या पाठीवर बसून निघाले. फुले आणि झालर असलेल्या सार्डिनने सजलेल्या या म्हशीवर स्वार होऊन उमेदवार जेव्हा आपला अर्ज भरण्यासाठी आला तेव्हा साऱ्यांच्याच नजरा त्याच्यावर होत्या. उमेदवार आझाद आलम यांच्यासोबत त्यांचे समर्थक सुद्धा वाजत गाजत आले होते. उमेदवार म्हशीवर स्वार होत अर्ज भरायला येतोय हे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

आणखी वाचा : अमेरिकन डॉलर, अगणित संपत्ती, सोन्याची बिस्किटं आणि दागदागिने! ‘या’ मंदिरात आहे कोट्यवधींचा खजिना!

 

काही लोकांनी त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पण लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी म्हशीवर स्वार होत या उमेदवाराने जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

म्हशीवर स्वार होण्याबाबत जेव्हा उमेदवार आझाद आलम यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, “महागाईच्या या युगात देश सध्या आर्थिक संकटाचा सामना करतोय. पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढले आहेत. आम्ही म्हैस पाळणारा साधारण व्यक्ती आहे आणि मला इंधन परवडत नसल्याने मी म्हशीवरून माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलो आहे.”

आणखी वाचा : ५० हजारांच्या पाणीपुऱ्या आणि त्याही मोफत… कारण वाचून तुम्हालाही वाटेल कौतुक

याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. नेटकरी मंडळी या व्हिडीओवर वेगवेगळे कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून येत आहेत. काहींनी या व्हिडीओला मनोरंजक म्हणून पाहिले तर काहींनी कमेंट्स करत अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे कारण ते पर्यावरणास अनुकूल आहेत, असं म्हटलंय.

आगामी बिहार ग्रामपंचायत निवडणुका येत्या २४ सप्टेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत पार पडणार असून एकूण ११ टप्प्यांत ही निवडणूक घेण्यात येणार आहे. आझाद आलम हे अर्ज भरुन परतले, मात्र त्यांच्या अर्ज भरण्याच्या हटके स्टाईलमुळे बिहारमध्ये अजूनही चर्चा सुरु आहे