मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असणाऱ्या बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नानंतर २७ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. या घोषणेनंतर आता तीन महिन्यानंतर  बिल गेट्स आणि मेलिंडा फ्रेंच गेट्स यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे.या दोघांनीही एक संयुक्त पत्रक जारी करत यापुढे आम्ही दोघं एकत्र राहू शकत नाही, असं स्पष्ट केलं होत. बिल गेट्स आणि मेलिंडा यांचं लग्न १९९४ साली झालं होतं. सोमवारी दोघांचा घटस्फोट झाला. बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे.

९० दिवसानंतर घटस्फोट

वॉशिंग्टन घटस्फोट कायद्यानुसार घटस्फोटासाठी याचिका दाखल झाल्यानंतर आणि अंतिम झाल्यानंतर दरम्यान ९० दिवसांचा प्रतीक्षा कालावधी निर्धारित करतात. न्यायालयाच्या रेकॉर्डनुसार किंग काउंटी, वॉशिंग्टन येथे सोमवारी न्यायाधीशांनी विवाहाला अंतिम रूप दिले, ज्यामध्ये कोणत्याही पक्षाला ‘जोडीदार समर्थन’ (spousal support)  मिळणार नाही किंवा त्यांची नावे बदलणार नाहीत असे तपशीलवार नमूद केले आहे. न्यायाधीशांनी गेटेस यांना त्यांची मालमत्ता विभक्त कराराच्या अटींनुसार विभाजित करण्याचे आदेश दिले, जे घटस्फोटाच्या अटींनुसार गोपनीय राहते.

हे विभाजन मे मध्ये उघड झाल्यापासून, गेट्सच्या कॅस्केड इन्व्हेस्टमेंटचे ३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स फ्रेंच गेट्सच्या नावे हस्तांतरित करण्यात आले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार घोषणेच्या वेळी त्यांच्या १४६ अब्ज संपत्तीचा हा एक अंश आहे. माजी जोडप्याची खाजगी मालमत्ता कशी विभागली जात आहे हे कधीच माहित नसते.

नात्यावर बरंच काम केल्यानंतर हा निर्णय

बिल यांनी सोशल मीडियावर ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली होती. यामध्ये त्यांनी, “बऱ्याच चर्चेनंतर आणि आपल्या नात्यावर बरंच काम केल्यानंतर आता आम्ही लग्नबंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २७ वर्षांमध्ये आम्ही आमच्या तीन मुलांना एकत्र वाढवलं. आम्ही एक फाऊण्डेशन तयार केलं जे जगभरातील लोकांना आरोग्य सुविधा आणि चांगलं राहणीमान देण्यासाठी प्रयत्न करत आहे,” असं म्हटलं होत. बिल आणि मेलिंडा यांची पहिली भेट १९८७ साली झाली होती. त्यावेळी मेलिंडा यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. सन १९९४ मध्ये या दोघांनी हवाई बेटांवरील लानी बेटावर लग्न केलं होतं.

पद कायम राहणार

मागे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ने हे दोघे घटस्फोट घेणार असले तरे फाउंडेशनमधील आपली जबाबदारी आणि पद कायम ठेवणार आहेत. फाउंडेशनमध्ये ६५ वर्षीय बिल हे अध्यक्ष आहेत. घटस्फोटानंतरही बिल आणि मेलिंडा एकत्र काम करतील. मेलिंडा सध्या फाउंडेशनच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.