दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ट्विटरवर #BoycottAmazon हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. अनेक भारतीयांनी ट्विटरवरुन हा हॅशटॅग वापरुन कंपनीच्या प्रोडक्टवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अ‍ॅमेझॉनवर हिंदू संस्कृतीचा अपमान करणाऱ्या गोष्टींची विक्री केली जात असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. खास करुन दारामध्ये टाकायच्या डोअर मॅटवर म्हणजेच पायपुसण्यांवर ॐ चे पवित्र चिन्ह तसेच अंतर्वस्त्रांवर हिंदू देवी-देवतांची चित्र असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

अनेक देशांमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये मानाचे स्थान असणाऱ्यादेवी-देवतांचे फोटो असणारे प्रोडक्ट विकले जातात. यामध्ये अगदी डोअर मॅटपासून ते अंतर्वस्त्रांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. याच प्रोडक्टचे फोटो पोस्ट करत परदेशातील तसेच भारतातील अनेक ट्विपल्सने अ‍ॅमेझॉनने हे प्रोडक्ट विकणे तातडीने बंद करावे अशी मागणी केली आहे. अनेकांनी अ‍ॅमेझॉनचे अ‍ॅप अनइन्स्टॉल करण्याची मागणीही केल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे हा हॅशटॅग वापरुन ट्विट करणाऱ्यांमध्ये परदेशात असणाऱ्या भारतीयांचाही समावेश आहे. भारतामध्ये असे प्रोडक्ट विकले जात नसले तरी जगातील इतर देशांमध्ये असे प्रोडक्ट विकून हिंदू संस्कृतीचा अपमान केला जात असल्याचा आरोप अनेकांनी ट्विटवरुन केला आहे.

अ‍ॅमेझॉनविरोधात अशाप्रकारे आक्षेप नोंदवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही हिंदू देवी-देवतांचे फोटो असणारे सामान विक्रीसाठी उपलब्ध केल्याप्रकरणी अ‍ॅमेझॉनविरोधात अनेकांनी आवाज उठवला होता. मात्र त्यावेळी अशा वस्तू यापुढे आमच्या माध्यमातून विकल्या जाणार नाहीत असं कंपनीने म्हटलं होतं. मात्र आता पुन्हा असाच प्रकार समोर आल्याने अनेकांनी यासंदर्भात ट्विटवरुन आक्षेप नोंदवला आहे.