कॅनडामधून एक विचित्र घटना समोर आली आहे. सध्या कॅनडामधील या घटनेची त्यांच्या देशात  तुफान चर्चा आहे. एक महिला आपल्या नवऱ्याच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घालून त्याला फिरवण्यासाठी घेऊन आल्याचा प्रकार कॅनडा समोर आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आलेली असताना ही महिला आपल्या पतीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा टाकून फिरत असतानाच सुरक्षा यंत्रणेतील अधिकाऱ्यांना दिसून आली. या प्रकरणामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या महिलेला आणि तिच्या पतीला प्रत्येक १५०० डॉलर म्हणजेच एकूण तीन हजार डॉलर्सचा (दोन लाख २० हजार भारतीय रुपये) दंड ठोठावला आहे. ही घटना कॅनडामधील क्युबेक शहरामध्ये घडल्याचे वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे. क्युबेकमध्ये स्थानिक प्रशासनाने रात्री आठ ते पहाटे पाच दरम्यान नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार रात्रीच्या वेळेस ही महिला एका व्यक्तीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घालून त्याला एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे रस्त्याच्याकडेने फिरवत होती. रात्री नऊच्या आसपास पोलिसांना ही महिला रस्त्यावर फिरताना दिसली. आठ वाजता नाईट कर्फ्यू सुरु झाल्यानंतरही रस्त्यावर अशाप्रकारे कोण फिरत आहे असा प्रश्न पोलिसांना पडला. पोलिसांनी या महिलेला थांबवून तिच्याकडे चौकशी केली असता गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधलेली या महिलेसोबत असणारी व्यक्ती तिचा पती असल्याचा खुलासा तिने केला. पतीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घालून फिरत असल्याबद्दल या महिलेवर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. मात्र एवढ्या रात्री कोणत्या अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडले आहेत याचं समाधानकारक उत्तर न देता आल्याने नाईट कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोघांना दंड करण्यात आला. नाईट कर्फ्यू असताना घराबाहेर का पडलात असा प्रश्न पोलिसांनी विचारला असता या महिलेने स्थानिक प्रशासनाने घराच्या आजूबाजूच्या एक किलोमीटरच्या परिसरामध्ये कुत्र्याला बाहेर भटकायला घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आल्याचं पोलिसांना सांगितलं तेव्हा पोलिसही चक्रावले.

पोलिसांनी या महिलेला कुत्रा सोबत घेऊन जाण्यास परवानगी आहे. मात्र तुम्ही तुमच्या पतीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून फिरत आहात असं सांगत दंड करणार असल्याचे सांगितले तेव्हा या महिलेने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दोघांनाही प्रत्येकी १५०० डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. सध्या या महिलेने दंडाची रक्कम भरण्यास नकार दिला आहे. दंड भरावा लागू नये म्हणून या महिलेने आरडाओरड करुन नाटक केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. कॅनडामध्ये दिवसोंदिवस करोनाबाधितांची संख्या वाटत असल्याने नाइट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. या कर्फ्यूच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा आणि उद्योगासंबंधितील लोकांना वगळता सर्वासामान्यांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.