ओम प्रकाश गुजर
याच्या पाचवर्षापासून आठ वर्षापर्यंत निरंतर बालपण विसरुन काम करणाऱ्या राजस्थानी ओम प्रकाश गुजर याला बालकामगारांसाठी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीसाठी ओळखले जाते. आपल्या कार्याने जगाचे लक्षवेधून घेतलेल्या ओमला २००६ मध्ये वयाच्या १४ वर्षी ‘वर्ल्ड चिल्ड्रेन प्राइज’ ने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार मिळविणारा ओम हा पहिला मुलगा आहे. आपल्यावरील परिस्थितीची जाण ठेवून इतर बालकांचे बालपण हरवू नये म्हणून ‘बचपन बचाओ अंदोलना’च्या साहाय्याने ओमने ५०० मुलांना न्याय मिळवून दिला. या मुलांची जन्म दाखले उपलब्ध करुन त्यांना मोफत शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.

मलाला युसूफझाई

पाकिस्तानच्या दुर्गम भागात महिला शिक्षणासाठी प्रयत्न करताना तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्याची शिकार झालेल्या मलाला युसूफझाई हिने बाल हक्क आणि शिक्षण क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मलालाने केलेले काम जगभरातील बालकांसाठी प्रेरणादायी आहे. मलालाला वयाच्या १७ व्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षापासून मलालाने डायरी लिहण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर तिने प्रसारमाध्यमातून महिला आणि अत्याचाराला वाचा फोडली. २०११ साली ‘वर्ल्ड चिल्ड्रेन प्राइज’ चे नामांकन मिळाले. त्यानंतर २०१३ साली मलाला हिला बाल शांतीपुरस्काराने गौरविण्यात आले. त्याच वर्षी तिने मॅस्क्सिकोच्या वतीने दिला जाणारा समानता पुरस्कारावर मोहोर उमटवली होती.

अॅनी फ्रँक
खेळण्याच्या वयात लेखणी पकडणाऱ्या अॅनी फ्रँकने आपल्या लिखाणाने जगाला प्रभावित केले आहे. वयाच्या १३ व्या वर्षापासून १५ वर्षापर्यंतच्या दोन वर्षाच्या कालावधीत लिहलेल्या डायरीने अॅनीला जगभरात ओळख निर्माण करुन दिली. ‘द डायरी ऑफ अ यंग गर्ल’ या तिची डायरी आतापर्यंत ७० भाषांमध्ये अनुवादीत झाली आहे. अॅनी फ्रँक हिचा जन्म १९२९ मध्ये जर्मनीमध्ये झाला. आपल्या १३ व्या वाढदिवसादिवशी शाळेमध्ये अॅनाने डायरी लिहण्यास सुरुवात केली होती. आपल्या वयाच्या मित्र मैत्रींणीसोबत खुलेपणाणे बोलण्यास घाबरत असल्यामुळे अॅनाने डायरीतून व्यक्त होण्याचा निर्णय घेतला होता.