तंत्रज्ञानाची किमया काय असू शकतं हे जाणून घ्यायंच असेल तर चीनमधली ही घटना वाचलीच पाहिजे. २०१३ साली मृत्यू पावलेल्या दांपत्याच्या मुलानं २०१७ मध्ये जन्म घेतला आहे. २०१३ पूर्वी जेई आणि ल्यूई झी या दांपत्यानं कृत्रिम गर्भधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यादृष्टीने त्यांनी वीर्य प्रयोगशाळेत जमा करणे आदी तांत्रिक बाबी पूर्ण केल्या होत्या. पण त्यांचं मुल जन्माला येण्याआधीच दुर्दैवानं कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूनंतर हे वीर्य वापरून मुल जन्मला घालण्याची परवनगी मिळावी यासाठी दाम्पत्यांच्या कुटुंबियांचा कायदेशीर लढा सुरु होता. अखेर मोठ्या कायदेशीर लढाईनंतर हे मुल चीनमध्ये जन्मला आलं. चीनमध्ये सरोगसी बेकायदेशीर आहे. त्यामुळे येथे सरोगसीद्वारे मुल जन्माला घालण्यास बंदी आहे. म्हणूनच दाम्पत्यांच्या वृद्ध आई वडिलांनी वीर्य देशाबाहेर नेलं आणि लाओसमध्ये सरोगसीद्वारे हे मुलं जन्मला आलं. या मुलाचं नाव तियांतियां ठेवण्यात आलं. चीनमध्ये एकच मूल जन्माला घालण्याची परवानगी आहे. आमचा मुलगा अपघातात गेला. आमचा वंश पुढे वाढावा इतकीच आमची इच्छा आहे असं कारण त्याच्या आजी आजोबांनी दिलं.

पण अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतरही या मुलाच्या मागे असलेलं संकट काही केल्या संपलं नाही. या मुलाच्या खऱ्या आई वडिलांचा चार वर्षांपूर्वीच मृत्यू झाला. सरोगसीद्वारे हे मुल जन्मलं पण ज्या महिलेच्या पोटात हे मुल वाढलं ती चिनी नागरीक नव्हती. त्यामुळे त्याला चिनी नागरिकत्त्व मिळावं की मिळू नये यावरून वाद झाला. अखेर हे मुलगा आपला नातू आहे हे त्याच्या आजीआजोबांना डीएनए टेस्ट देऊन सिद्ध करावं लागलं.