सोन्याची किंवा चांदीची वस्तू हरवल्यावर आपले धाबे दणाणते. इतकी महागडी गोष्ट हरवल्याने आपला जीव पार कासावीस होऊन जातो. त्यातही ती गोष्ट कोणी भेट म्हणून दिली असेल तर विचारायलाच नको. न्यू जर्सी मध्ये नुकतीच एक अतिशय अजब घटना घडली. एक महिला आपले बाथरुम साफ करत असताना तिच्या हातातील हिऱ्याची अंगठी पडली आणि हरवली. इथपर्यंत ठिक आहे. पण चक्क ९ वर्षांनंतर ही अंगठी तिला परत मिळाली. ही अंगठी तिला तिच्या नवऱ्याने लग्नाच्या २० व्या वाढदिवसानिमित्त भेट दिली होती. आता ही अंगठी फ्लश झाल्याने पुन्हा काही सापडणार नाही असाच तिचा आणि तिच्या कुटुंबातील सगळ्यांचा समज झाला. नवऱ्याने दिलेली अंगठी हरवल्याने ही गोष्ट नवऱ्याला सांगायला मला खूप कसेतरी वाटत होते असे पाऊला स्टँटन म्हणाली.

तिच्या नवऱ्याने तिला तशीच दुसरी अंगठी आणू असे म्हटले पण तिला तीच अंगठी हवी होती. सगळे प्रयत्न करुन झाल्यानंतर तिने २ वर्षांपूर्वी पाईपलाईनच्या सफाईचे काम करणाऱ्या सार्वजनिक सफाई विभागाकडे याबाबतची चौकशी केली. मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पण नुकतीच ती आणि तिचा नवरा थँक्स गिव्हींगच्या ट्रीपवरुन परत आले आणि तिला धक्का बसेल अशीच घटना घडली. सार्वजनिक सफाई विभागाला संपर्क करा अशी सूचना लिहीलेली चिठ्ठी या महिलेच्या दारावर लावली होती. ही चिठ्ठी पाहून मी अक्षरश: थबकले आणि खूप आश्चर्यचकीत झाले असे पाऊला म्हणाल्या.

आमच्या भागात ११०० मलवाहिन्या आहेत. यामधील एका पाईपमध्ये ही रिंग सार्वजनिक विभागाला सापडली. या कर्मचाऱ्यांनी ती काढली आणि साफ करुन ठेवली. त्यामुळे ९ वर्षांपूर्वी हरवलेली माझी रिंग मिळू शकली असे पाऊला अतिशय आनंदाने सांगत होत्या. त्या म्हणाल्या, इतक्या वर्षात ही रींग हरवू शकत होती, तुटून जाऊ शकत होती, पण आपल्याला एखादी गोष्ट मिळायची असेल तर ती काहीही झाले तरी मिळतेच. अशाप्रकारे ९ वर्षांनंतर हरवलेली अंगठी मिळणे ही खऱ्या अर्थाने जादूई घटना आहे. त्यामुळे २०१८ चा ख्रिसमस आपल्यासाठी अतिशय खास असेल असेही त्या म्हणाल्या. आता ही अंगठी आपल्याकडून कधीच हरवणार नाही याची आपण खूप जास्त काळजी घेणार असल्याचे त्या म्हणाल्या.