शोले हा बहुचर्चित ब्लॉकबस्टर सिनेमा म्हटला की आपल्याला ‘जय’-‘विरू’ तर आठवतातच पण त्याचसोबत आठवतो त्यातला खलनायक ‘गब्बर सिंग’. गब्बर सिंग हे काल्पनिक पात्र आहे असे सिनेमात सांगण्यात आले होते. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का? गब्बर सिंग हा डाकू खरोखर होऊन गेला आहे. एवढेच नाही तर त्याला मोदींनी गोळ्या घालून ठार केले.

खराखुरा गब्बर सिंग मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधे राहात असे. पोलिसांचे अपहरण करून त्यांचे नाक कापण्यासाठी तो गब्बर सिंग कुप्रसिद्ध होता. चंबळच्या खोऱ्यात खऱ्याखुऱ्या गब्बरची चांगलीच दहशत होती. स्थानिक त्याच्या गोष्टीही सांगतात. एवढेच नाही तर खऱ्या गब्बरवरही ५० हजारांचे इनाम लावण्यात आले होते. लोकांनी सांगितलेल्या गोष्टीनुसार या गब्बरचा जन्म भिंड जिल्ह्यातील दांग या गावात १९२६ मध्ये झाला होता. त्याच्या घरची परिस्थिती बेताची होती. मात्र व्यायामाची त्याला लहानपणापासून आवड होती. व्यायाम करून त्याने पिळदार शरीर कमावले होते. १९५५ मध्ये म्हणजेच वयाच्या २९ व्या वर्षी गब्बर सिंग कुख्यात डाकू गुज्जर सिंगच्या टोळीत सहभागी झाला. त्यानंतर काही काळातच गब्बर सिंगने स्वतःची टोळीही तयार केली. ‘इंडिया टुडे’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

एक कुख्यात दरोडेखोर म्हणून गब्बर सिंग ओळखला जाऊ लागला. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानचा काही भाग या सगळ्या ठिकाणी त्याची दहशत पसरली होती. त्याच्यावर ५० हजारांचे इनामही लावण्यात आले होते. त्याची दहशत संपवण्यासाठी १९५९ मध्ये मध्य प्रदेश सरकारने एक विशेष तपास पथक तयार केले. यामध्ये राजेंद्र प्रसाद मोदी नावाचा एक पोलीस अधिकारी होता. राजेंद्र प्रसाद मोदी हे त्या काळात डीएसपी होते. त्यांनी गब्बर सिंगचा नायनाट करण्यसाठी आवश्यक ती सगळी माहिती गोळा केली. त्यानंतर चंबळ खोऱ्यात जे पथक गब्बर सिंगचा खात्मा करण्यासाठी गेले होते त्याचे नेतृत्त्वही राजेंद्र प्रसाद मोदी यांनीच केले.

नोव्हेंबर १९५९ मध्ये राजेंद्र प्रसाद मोदी यांचे पथक आणि गब्बर सिंग आणि त्याच्या टोळीत चकमक झाली. बसवर टपावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी या चकमकीचे प्रत्यक्षदर्शी होते. पोलीस आणि दरोडेखोर यांच्यात गोळीबार सुरू होता. या गोळीबारात गब्बरच्या टोळीतले एक एक करून सगळे साथीदार मारले गेले. मात्र गब्बर सिंग या चकमकीतून निसटला. मात्र दुसऱ्या एका चकमकीत गब्बर सिंग मारला गेला. के. एफ. रूस्तमजी या पोलीस अधिकाऱ्याने गब्बर सिंगचा खात्मा झाल्याची बातमी पंडित नेहरूंना सांगितली. त्यानंतर त्यांना मध्य प्रदेश पोलिसांचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले.

याच काळात सलीम खान यांचे वडिल याच ठिकाणी होते. त्यांनी गब्बर सिंगबाबतच्या अनेक कथा ऐकल्या असणारच. ज्या कथांमधूनच कदाचित सलीम-जावेद म्हणजेच सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी गब्बर सिंग हे शोले सिनेमातले पात्र लिहिले.  ते पात्र काल्पनिक होते, मात्र खराखुरा गब्बर सिंग हा डाकू होऊन गेला आहे ही माहिती आता आपल्याला समजली आहेच.