पाकिस्तानमधून अनेकदा विचित्र आणि अनोख्या घटना समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली असून इथे जुगार खेळल्याच्या आरोपावरून चक्क एका गाढवालाच अटक करण्यात आली आहे.

पाकिस्‍तानच्या पंजाब प्रांतातील ‘रहीम यार खान’ भागात शनिवारी पोलिसांनी या गाढवाला अटक केली. याशिवाय आठ लोकांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरुन जवळपास एक लाख 20 हजार रुपयेही जप्त केले. हे जुगारी गाढवाच्या शर्यतीसाठी पैसे लावत होते. विशेष म्हणजे पोलिसांनी गाढवाचे नावही एफआयआरमध्ये टाकले असून गाढवाला अटक करण्यात आली आहे. पत्रकार नायला इनायत यांनी ट्विटरवर आरोपी आणि गाढवाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत पाकिस्तानी वृत्त वाहिनीची एक लिंकही शेअर केली आहे.

गाढवाला अटक केल्याची बातमी समोर आल्यापासून सोशल मीडियावर पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या पोलिसांना ट्रोल केलं जात असून नेटकरी पोलिसांच्या या कारवाईची खिल्ली उडवत आहेत.