वर्ष 2018 मध्ये देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दुबईची राजकन्या शेख लतीफा पकडली गेली होती. मंगळवारी तिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला. बीबीसीने मंगळवारी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये शेख लतीफा, “मला माहित नाही अशा परिस्थितीत मी जिवंत राहिल की नाही”, असं बोलताना दिसतेय.

‘मी एक बंधक आहे. या व्हिलाचं रुपांतर तुरूंगात करण्यात आलंय. मी मोकळा श्वास घेण्यासाठी बाहेरही जाऊ शकत नाही” असं लतीफा या व्हिडिओत म्हणतेय. लतीफाने व्हिलाच्या शौचालयात लपून फोनवर हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. “माझी कधी सुटका होईल हे मला माहित नाही आणि सुटका झाल्यानंतर स्थिती काय असेल याचीही कल्पना नाही. माझ्या सुरक्षेबाबत आणि जीवनाबाबत दररोज चिंता वाटते” असं ती या व्हिडिओमध्ये म्हणतेय. व्हिडिओतील ‘जेल व्हिला’ संयुक्त अरब अमीरातमधील एखाद्या शहरातच असल्याचं सांगितलं जात आहे.

2018 मध्ये केला होता देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न :

सध्या इथले राजे आहेत शेख मोहम्मद बिन रशिद-अल-मकतुम. ते युएईचे पंतप्रधानपदही सांभाळतात, आणि शेख लतीफा ही त्यांचीच मुलगी. २०१८ मध्ये तिने समुद्रीमार्गे बोटीतून देश सोडून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण, भारताजवळ आली असताना तिला पकडण्यात आलं होतं. त्यानंतर तिची कोणतीही माहिती समोर आली नव्हती, आणि आता तिचा व्हिडिओ समोर आला आहे.