देशभरात करोना व्हायरसविरोधात लढाई सुरू असताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीरने मानवतेचं आदर्श उदाहरण देशासमोर ठेवलंय. गंभीरने त्याच्या घरी घरकाम करणाऱ्या एका महिलेचे स्वतः अंत्यसंस्कार केलेत.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार ही महिला सहा वर्षांपासून गौतम गंभीरच्या घरी घरकाम करत होती. मूळ ओडिशाच्या रहिवासी सरस्वती पात्रा यांना दीर्घ काळापासून ‘शुगर’ आणि ‘ब्लडप्रेशर’चा त्रास होता. काही दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, २१ एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनानंतर, “त्या माझ्या कुटुंबाचाच भाग होत्या. त्यांचे अंत्यसंस्कार करणं माझं कर्तव्य होतं. जात, धर्म, धर्म किंवा सामाजिक प्रतिष्ठेचा विचार न करणारा मी व्यक्ती आहे. एक चांगला समाज निर्माण करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. हीच माझी भारताची कल्पना आहे…ओम शांती !”, अशा आशयाचं ट्विट गौतम गंभीरने केलं आहे.

गंभीरच्या या ट्विटवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत असून त्याचं कौतुक केलं जातंय.