मॅक्सिकोमध्ये बुधवारी एका विचित्र प्रकरण चांगलेच चर्चेत होते. सध्या मॅक्सिकोमध्ये या प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. झालं असं की या व्हिडिओमध्ये माणसाच्या आकाराचा उंदीर दिसत आहे. हा उंदीर काही सरकारी सफाई कर्मचाऱ्यांना एका छोट्या नाल्यात आढळून आला. हे कर्मचारी मॅक्सिकोमधील सिटीतील नालेसफाईचं काम करत होते त्यावेळी त्यांना हा उंदीर सापडला. यासंदर्भात तपास केला असता कर्मचाऱ्यांना सापडलेली गोष्टी ही उंदीरच असून तो हॅलोवीनसाठी तयार करण्यात आला होता. भूतांचा उत्सव म्हणून साजऱ्या होणाऱ्या हॅलोवीनदरम्यान लोकांना घाबरवण्यासाठी बनवण्यात आलेला हा उंदीर चुकून नाल्यामध्ये पडला आणि तिथेच अडकून राहिला होता. याच हॅलोवीनच्या उंदराला कर्मचारी साफ करतानाच व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मॅक्सिकोमध्ये माणसाच्या आकाराचा उंदीर सापडला अशा मजकुरासोबत व्हायरल केला जात आहे. खरोखरच हा हॅलोवीनसाठी बनवण्यात आलेला उंदीर आकाराने एवढा मोठा आहे की त्याला साफ करणारे त्याच्या आजूबाजूला असणारे सफाई कर्माचारी अगदीच छोटे दिसत आहे. सुरुवातील लोकांना हा खरा उंदीर वाटला. हॅलोवीनदरम्यान हा उंदीर नाल्यात पडल्याची शक्यता सफाई कर्माचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र काही ऐकून घेण्याआधीच लोकांनी आरडाओरड सुरु केल्याने काही काळ या परिसरात एकच गोंधळ उडाल्याचे चित्र दिसले. या उंदराचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका महिलेने त्यावर दावा सांगितला आहे. हा उंदीर मी काही वर्षांपूर्वी हॅलोवीनसाठीच तयार केल्याचा दावा या महिलेने केला आहे.

एकदा जोरदार पावसामध्ये हा उंदीर वाहून गेल्याचा दावा या उंदरावर हक्क सांगणाऱ्या एवलीन नावाच्या महिलेने केला आहे. या उंदराचा शोध घेण्यासाठी आपण त्यावेळी अनेकांची मदत मागितली. नाल्यामध्ये त्याला शोधण्यासाठी इतरांना विनंती केली मात्र कोणीच आपली मदत केली नाही असं एलवीनचं म्हणणं आहे. आता इतक्या वर्षानंतर मला हा उंदीर परत मिळाला आहे. मात्र तो मी माझ्याजवळ ठेवेन की नाही हे मी ठापणे सांगू शकत नाही असंही या महिलेने म्हटलं आहे. या नालेसफाईमध्ये मॅक्सिको सीटीमध्ये नाल्यामधून २२ टन कचरा काढण्यात आला आहे.