हिरोशी मारामारी करताना कधी कधी आपल्याच माणसांना गुंडांनी मारल्याचे विनोदी प्रसंग अनेकदा सिनेमात दाखवतात. हे मजेशीर प्रसंग पडद्यावर पाहताना किती हसू येतं. पण, हेच प्रसंग खऱ्या आयुष्यात घडले तर…? सध्या सोशल मीडियावर एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. ज्यात चोरी करायला आलेल्या चोरानं चुकून आपल्या साथीदाराला गंभीर जखमी केल्याचं दिसत आहे. यामुळे दोघांचा चोरीचा प्रयत्न तर फसलाच पण मार लागल्यामुळे शुद्ध हरपलेल्या साथीदाराला ओढत नेऊन तिथून पोबारा करण्याची वेळ या चोरावर आली.

आतापर्यंत अनेक विनोदी सिनेमात असे प्रकार आपण पाहिले असतील पण, हाच प्रसंग प्रत्यक्षात पाहताना अनेकांना आपलं हसू आवरत नव्हतं. शंघायमध्ये हा प्रकार घडला असून हे दोघंही बँक लुटण्यासाठी आले होते. बँकेचा काचेचा दरवाजा विट फेकून फोडण्याचा प्रयत्न हे दोघंही करत होते. त्यातला एक चोर विटेनं दार फोडण्यात यशस्वी झाला तर दुसरा विट फेकून मारत असताना त्याचा निशाणा चुकला आणि विट त्याच्या साथीदाराच्या डोक्यावर बसली. हा मार इतका जबरदस्त होता की त्याचा साथीदार क्षणात शुद्ध हरपून खाली कोसळला. त्यामुळे चोरीचा प्रयत्न तिथेच फसला.

जर चोर असाच मूर्खपणा करत राहिले तर जास्तवेळ काम करण्याचे आमचे कष्ट वाचतील अशी उपरोधिक ओळ लिहित शंघाय पोलिसांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आतापर्यंत १४ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.