आपल्याकडे सावळा किंवा त्याहूनही अधिक गडद रंगाच्या मुलींना त्यांच्या रंगावरून चिडवले जाते. त्यात ‘ए काळी’ अशी हाक मारून चिडवण्याचे प्रकार तर सर्रास घडतात. त्यामुळे नकळत अनेकींच्या मनात आपल्या काळ्या रंगाविषयी न्यूनगंड तयार होतो. त्यातून भरीस भर म्हणजे बाजारात अशा अनेक फेअरनेस क्रिम आहेत ज्या या मुलींना गोरे बनवण्याचा दावा करतात. गोरा रंग असला कि प्रसिद्धी, पैसा, यश असे सगळेच मिळते अशा स्वरुपाच्या भ्रामक समजूती देखील मुलींच्या मनात भरतात. अनेकांनी याविरुद्ध आवाज उठवला आहे पण या फेअरनेस कंपन्यांचे दावे काही कमी झाले नाही.
गो-या रंगाविषयीच्या याच खुळचट समजूती खोडून काढण्यासाठी महाराष्ट्रातल्या एका क्रिएटीव्ह एजेन्सी आणि स्वयंसेवी संस्थेने मिळून एक व्हिडिओ बनवला आहे. मुलींच्या मनातील न्यूनगंड कमी करण्यासाठी आणि गो-या रंगाचा उधोउधो करणा-यांच्या खुळचट समजूत खोडून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यात व्हिडिओमध्ये सावळ्या रंगाच्या काही मुलींनी आपली मत मांडली आहे. ‘मी सावळी आहे किंवा माझा रंग हा इतरांसारखा गोरा नाही मग काय झाले ? आम्हाला आमच्या रंगाचा अजिबात न्यूनगंड नाही कारण जे आहे ते नैसर्गिक आहे. रंगाचा वारसा आम्हाला पिढ्यानपिढ्यापासून मिळत आहे. मग या रंगाचा न्यूनगंड वाटण्यासारखे काय आहे ?’ असे या मुली अभिमानाने विचारतात. या मुली तुमच्या आमच्या सारख्याच आहेत. ज्यांना त्यांच्या रंगामुळे अनेकदा टोमण्यांना किंवा मित्र मैत्रिणींच्या मस्करींना सामोर जावे लागते. पण तरीही या मुलींनी याबद्दल मनात न्यूनगंड बाळगला नाही इतरही मुलींनी तो न्यूनगंड बाळगू नये यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी या व्हिडिओ मार्फत केले आहे.
भारतात अनेक देशी विदेशी सौंदर्यप्रसाधन कंपन्या आहेत. भारतीयांची रंगसंगती ही येथल्या हवामानानुसार सावळी आहे. खर तर असा वर्ण असणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले असते. सावळ्या रंगाच्या व्यक्तींना रक्ताचे कोणतेही आजार होत नाही खरे तर ही सावळ्या रंगाच्या व्यक्तींसाठी आनंदाची गोष्ट आहे पण तरीही कोणी एक फेअरनेस कंपनी मनात काहीतरी भरते ते ऐकून अनेक जण आपल्या रंगाचा न्यूनगंड बाळगतात. सावळा रंग असणे म्हणजे कुरूप असणे ही आपल्याकडे प्रचलित असलेली आणखी एक खुळचट मानसिकता आहे. पण फॅशनविश्वात गो-या रंगापेक्षा सावळ्या रंगाच्या मुलींना अधिक सुंदर समजले जाते. कारण या मुलींवर कोणताही रंग सहज खुलून दिसतो. त्यामुळे तिथल्या लोकांना सावळ्या रंगाचे अधिक आकर्षण असते पण असे असताना मात्र आपण निर्सगाने वरदान दिलेल्या या रंगाचा न्यूनगंड बाळगतो. या व्हिडिओची चर्चा सध्या सोशल मिडियावर होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या रंगावर प्रेम करायला शिकवेन हे नक्की !