विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरामध्ये जल्लोष साजरा केला जात आहे. मँचेस्टर येथील मैदानात झालेल्या समान्यावर पावसाचे सावट होते. मागील काही दिवसांपासून अनेक समाने पावसामुळे रद्द करावे लागल्याने भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. मात्र पावसाने दोनदा व्यत्यय आणल्यानंतरही सामना झाला आणि भारताने भारताने पाकिस्तानला डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार ८९ धावांनी हरवले. या विजयाचे सेलिब्रेशन अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि मँचेस्टरपासून ट्विटरपर्यंत सगळीकडेच झाले. विशेष म्हणजे भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे सेलिब्रेशन पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्येही झाले. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला असून पाकिस्तानी वंशाचे लेखक तारेक फतेह यांनीही हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

रविवारी झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यामध्ये दोनवेळा पावसाचा व्यत्यय आल्याने सामना लांबला. तरीही भारताने सामना जिंकल्यानंतर भारतात स्थानिक वेळेनुसार रात्री १२ च्या आसपास जणून दिवाळीच साजरी करण्यात आली. फटाके, ढोल ताशांच्या गजरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांनी हा विजय साजरा केला. तर दुसरीकडे या विजयाचा सेलिब्रेशन पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्येही झाल्याचे ‘बनुक झरीना बलुच’ या ट्विट अकाऊण्टवरुन ट्विट करत म्हटले आहे. या ट्विटमध्ये या माहिलेने एक छोटा व्हिडिओही पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन लहान मुली भारताचा आणि बलुचिस्तानचा झेंडा फडकवताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये झरीना लिहिते, ‘भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या शानदार विजयासाठी त्यांचे अभिनंदन. माझ्या दोन छोट्या भाच्यांनी भारताचा पाकिस्तानवरील विजय साजरा केला. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भारत १९७१ (बांगलादेश युद्ध) सारखी कामगिरी पुन्हा करुन पाकिस्तानच्या नशिबी पराभवच आहे हे जगाला दाखवून देईल, अशी अपेक्षा मला आहे.’

तारेक फतेह यांनीही हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

काही जणांनी या व्हिडिओच्या सत्यतेसंदर्भात कमेंट करुन शंका उपस्थित केली आहे. सामना रात्री उशीरा संपला तर व्हिडिओमधील मुली उन्हामध्ये उभ्या राहून सेलिब्रेशन कसे करत आहेत असा सवाल काहींनी उपस्थित केला. तर हा व्हिडिओ आधीच शूट करुन ठेवण्यात आला असेल असे उत्तर या शंकांना काही जणांनी दिले आहे. मागील अनेक वर्षांपासून बलुचिस्तानमधील नागरिकांवर पाकिस्तान सरकारकडून अत्याचार होत असल्याचे बलुचिस्तानमधील स्थानिकांचे म्हणणे आहे. आम्हाला आमचा स्वतंत्र प्रदेश हवा आहे या मागणीसाठी बलुचिस्तानमध्ये अनेकदा आंदोलने होतात.