कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हल्ली फार कष्ट घेण्यापेक्षा थेट गुगलचं दार ठोठावलं जातं. प्रश्न काहीही असो, गुगल तुम्हाला याचं अचूक उत्तर देणारच. तेसुद्धा अगदी विस्तृत तपशीलासह, हा सगळ्यांचाच समज. मुळात गुगलवर सर्वांचच आयुष्य असं काही अवलंबून आहे की आपणही त्याने दिलेली उत्तरंच अगदी अचूक असल्याचं ठरवत त्यांची मदत घेतो. पण, मुळात गुगलही काही बाबतीत चुकू शकतं यावर तुमचा विश्वास आहे का? काय म्हणता अजूनही विश्वास बसत नाहीये यावर. पण, हे खरं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान असं टाईप करुन या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची कमांड गुगलला देताच जे उत्तर समोर येतंय ते पाहून सध्या नेटकरी चक्रावले आहेत. मुख्य म्हणजे अनेकांसाठी हा एक धक्काच आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान असा प्रश्न विचारला असता पहिल्याच क्रमांकावर विकिपीडीयाचं पेज समोर येतं. ज्यामध्ये भारताच्या पंतप्रधानांची यादी आहे. यातच देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून उत्तरात जवाहरलाल नेहरु असं नाव समोर येतं खरं. ठळक अक्षरांमध्ये त्यांचं नाव असलं तरीही फोटो मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिसत आहे. बुधवारी म्हणजेच २५ एप्रिलला सोशल मीडियावर या गुगल गोंधळाची चर्चा पाहायला मिळाली.

वाचा : ऑलिम्पिक पदकाचा वेध घेण्याचे स्वप्न!

देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून नाव नेहरुंचं पण फोटो मात्र मोदींचा, हा सर्व गोंधळ अनेकांनाच चक्रावून गेला. त्याविषयीच मग एकामागोमाग एक स्क्रीनशॉट पोस्ट करत नेटकऱ्यांनी या गोंधळाबद्दल नाराजी व्यक्त केली. हे असं नेमकं का होतंय? असं म्हणत काही नेटकऱ्यांनी गुगल इंडियाला याविषयीचे प्रश्न विचारले. तर हा ‘गुगल एरर’ आहे असं म्हणत काहींनी याला विनोदी वळण देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गुगलकडून अद्यापही या प्रकरणी कोणतंच स्पष्टीकरण आलेलं नाही. पण, ही तांत्रिक चूक असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. कारण, भारताच्या पंतप्रधानांची यादी असलेल्या या लिंकवर क्लिक केलं असता त्याल स्पष्टपणे नमूद केलं आहे की, ‘नरेंद्र मोदी हे २६ मे, २०१४ पासून भारताचे चौदावे पंतप्रधान आहेत.’