भारतीय महिला हॉकी टीमने आज इतिहास रचला. तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने १-० च्या फरकाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत केलं आहे. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केलीय. या कामगिरीमुळे प्रत्येक भारतीय संघावर शुभेच्छाचा वर्षाव करत आहे. हे यश मिळवण्यासाठी संघाला मदत करणारे प्रशिक्षक शोर्ड मरिन (Sjoerd Marijne) यांनी जिंकल्यावर आपला आनंद व्यक्त करत मज्जेशीर पोस्ट शेअर केली आहे. शोर्ड मरिन यांनी २ दिवसापूर्वी केलेल्या पोस्टच्या अनुषंगानेचं ही पोस्ट केली आहे.

काय आहे शोर्ड मरिन यांची पोस्ट?

शोर्ड यांनी भारतीय महिला हॉकी टीमने उपांत्य फेरीत प्रवेश केल्यावर काही वेळाने त्यांच्या सोशल मीडियावरून एका फोटोसह मज्जेशीर कॅप्शन लिहून पोस्ट शेअर केली. दोन दिवसापूर्वी त्यांनी “घरी येण्यासाठी मला अजून काही दिवस थांबावे लागेल असे कुटुंबाला कॉल करून सांगतो” अशा कॅप्शनसह पोस्ट केली होती. याच अनुषंगाने त्यांनी आज “क्षमस्व कुटुंब, मी पुन्हा नंतर येत आहे” अशा कॅप्शनसह पोस्ट केली आहे. ही पोस्ट करताना त्यांनी पूर्ण संघासोबतचा फोटोही शेअर केला आहे.

नेटीझन्सच्या प्रतिकिया

शोर्ड मरिन यांनी केलेल्या पोस्ट वर ट्विटरवर १ तासात ५० हजार लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एक युजर म्हणतो की, “तुम्ही भारतीयांची मन उंचावली आहे” तर दुसरा युजर म्हणतो की, सर आता दुसऱ्या टीमच्या प्रशिक्षकांना घरी पाठवूनचं तुम्ही घरी या.” “अभिनंदन सर. तुम्ही टोक्योमध्येच अजून राहा आणि सुवर्ण पदक घेऊन या.”

द्रोणाचार्य पुरस्कार देण्याची मागणी

सोशल मीडियावर शोर्ड मरिन यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्याची मागणी केली जात आहे. त्यांच्या मार्गदर्शना खाली भारतीय संघाने केलेल्या कामगिरीप्रती त्यांना हा पुरस्कार देण्याची मागणी नेटीझन्स करत आहेत. हा पुरस्कार प्रशिक्षकांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सरकारद्वारे दिला जातो.