फटाक्यांनी भरलेलं फळ खायला दिल्यामुळे केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात एका गर्भवती हत्तीणीला आपले प्राण गमवावे लागले. २७ मे रोजी घडलेली ही घटना केरळमधील वन-विभागाच्या अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टमुळे प्रसारमाध्यमांमध्ये आली. देशभरातून या घटनेचा निषेध होत आहे, अनेक सेलिब्रेटींनीही या प्रकाराबद्दल चीड व्यक्त केली असून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनीही या घटनेची दखल घेतली असून, सोशल मीडियावर त्यांनी या प्रकाराबद्दल शोक व्यक्त केला आहे.

केरळमधील प्रकार ऐकून मला धक्काच बसला, मुक्या जनावरांविरोधात असं कृत्य करणं म्हणजे एखाद्या निरपराध माणासाचा खून केल्यासारखंच असल्याचं रतन टाटा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर म्हटलं आहे.

दरम्यान, प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. अखेरीस राजकीय स्तरावरही याची दखल घेण्यात आलेली असून, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, केरळ वन-विभागाच्या अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टमुळे हा प्रकार उजेडात आला. हत्तीणीच्या मृत्यूसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी प्रसारमाध्यमांनी बोलताना दिली.