डोनाल्ड ट्रम्प नुकतेच आशिया खंडाच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याबरोबर गोल्फ खेळत होते. शिंझो आबे गोल्फ खेळत असताना खाली पडले आणि नेमका हाच क्षण कॅमेरात टिपला गेला. विशेष म्हणजे हे सगळे सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना गोल्फ खेळायला खूप आवडते. म्हणूनच शिंझो आबे यांनी ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळण्याचे निश्चित केले.

जपानी वाहिन्यांचे प्रतिनिधी पंतप्रधान गोल्फ खेळत असल्याचे क्षण आपल्या कॅमेरात टिपत होते. यामध्ये आबे यांनी निळ्या रंगाची पँट आणि पांढऱ्या रंगाचा स्वेटर घातल्याचे दिसत आहे. गोल्फच्या मैदानातून बाहेर रेतीच्या ठिकाणी ते पडले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. याठिकाणी असणाऱ्या उतारावरुन ते घरंगळत खाली आले. त्यांच्या डोक्यावर असणारी टोपीही यावेळी पडली. त्यानंतर लगेच स्वतःच उठून ते पुन्हा मैदानात परतत असल्याचेही यात स्पष्ट दिसते.

सोशल मीडियावर या व्हिडिओवर बऱ्याच कमेंटस आल्या आहेत. अशाप्रकारे ट्रम्प जमिनीवर पडले असते तर? ट्रम्प जपान दौऱ्यावर असताना पंतप्रधान खाली पडले. आबे यांना आपण पडलो हे कळायच्या आतच या व्हिडिओ क्लीप वेगाने व्हायरल झाल्या. जपानी नागरिकांच्या ट्विटर अकाऊंटवर या व्हिडिओला आणि त्याखालील कमेंटसला उधाण आले आहे. व्हिडिओमधील आणखी एक गोष्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे शिंझो आबे पडले तेव्हा ट्रम्प यांचे त्याकडे लक्ष नसून ते दुसरीकडे असल्याने त्यांना आबे पडल्याचे लक्षात आले नाही.