तिचे वय एवघे आठ वर्षे. खेळण्या-बागडण्याच्या आणि शिकण्याच्या वयात झालेल्या लग्नामुळे ती काहीशी गोंधळली. मात्र सासरच्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आता वैद्यकीय शिक्षणाची ‘नीट’ (NEET) ही प्रवेश परीक्षा पास झाली असून ती डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहात आहे. जयपूरमधील अतिशय लहान गावातील रुपा यादव हिची ही गोष्ट.

पाच भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या रुपाचे तिच्या मोठ्या बहीणीच्या लग्नातच लग्न लावून देण्यात आले. तेव्हा ती केवळ आठ वर्षांची म्हणजेच तिसरीत तर तिचा पती शंकरलाल १२ वर्षांचा होता. लग्नानंतर तिने आपल्या दिराने दिलेल्या पाठिंब्यामुळे शिक्षण सुरु ठेवले. दहावीत ८४ टक्के गुण मिळाल्यानंतर नातेवाईक आणि शेजारपाजाऱ्यांकडून तिने शिक्षण सुरुच ठेवावे असा आग्रह झाला. सासरच्यांनीही त्याला मान्यता दिल्याने रुपाने पुढचे शिक्षण घेतले.

गावापासून ६ किलोमीटर दूर असलेल्या महाविद्यालयात रुपाने पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळत तिने आपली बारावीही यशस्वीपणे पूर्ण केली, इतकेच नाही तर ८४ टक्के मिळवत तिने आपल्या हुशारीची चुणूक पुन्हा एकदा दाखवून दिली. भीमराम यादव या आपल्या काकांना अचानक आलेला हृदयरोगाचा झटका आणि वेळेत वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने त्यांचा झालेला मृत्यू यामुळे मी डॉक्टर होण्याचे आधीपासूनच ठरवले असल्याचे २० वर्षाची रुपा म्हणाली.

‘LG’चा फुलफॉर्म माहितीये? 

दोन वेळा वैद्यकीय शिक्षणाची प्रवेशपरीक्षा देऊनही त्यात म्हणावे तसे यश मिळाले नाही. मात्र तिने हार न मानता आपले प्रयत्न चालूच ठेवले आणि तिसऱ्या प्रयत्नात तिने ‘नीट’ परीक्षेत ६०३ मार्क मिळवत यशाला गवसणी घातली. खासगी महाविद्यालयातील शुल्कामुळे त्या ठिकाणी प्रवेश घेणे शक्य नव्हते. यावेळी तिच्यातील हुशारी आणि शिकण्याची जिद्द लक्षात घेऊन अलेन कोचिंग इन्स्टीट्यूटने एका खासगी महाविद्यालयाने तिला फीच्या रकमेच्या काही टक्के शिष्यवृत्ती देत तिच्या फीचा बराच भार कमी केला. याशिवाय महाविद्यालयाच्या वसतिगृहात तिची राहण्याचीही व्यवस्था केली.

माझे सासरचे लोक माझे पालकच असल्याने त्यांनी मला शिक्षणासाठी कायमच प्रोत्साहन दिले. मात्र आमच्या कुटुंबाचा शेती व्यवसाय असल्याने त्यातून म्हणावे तितके उत्पन्न येत नाही. त्यामुळे माझ्या पतीने टॅक्सी चालवण्याचा उद्योग सुरु केला आणि माझ्या शिक्षणासाठी लागणाऱ्या इतर खर्चाची तजवीज केली, असे रुपाने सांगितले. अलेन कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये सध्या रुपा एमबीबीएसचे शिक्षण घेत असून लवकरच ती डॉक्टर म्हणून समाजाची सेवा करेल अशी आशा आहे.

Video : विषारी सापाला पकडण्याचा थरार पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल