उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला काही दिवसांपूर्वी आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा त्याला कार कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमधून फोन आला. सर्व्हिस सेंटरमधील कर्मचाऱ्याने या व्यक्तीला तुमची दोन वर्षांपूर्वी हरवलेली कार सापडली असून ती सर्व्हिसिंग करुन जवळच्या स्थानिक पोलीस स्थानकात परत पाठवण्यात आल्याची माहिती दिली. ही गाडी भित्तूर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी कुशलेंद्र प्रताप सिंग यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती फोनवर या व्यक्तीला दिली.

उत्तर प्रदेशमधील गँगस्टर विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या ज्या पोलिसांच्या तुकडीवर गोळीबार करण्यात आला त्यामध्ये सिंग यांचा समावेश होता. तीन जुलैच्या रात्री झालेल्या या हल्ल्यात आठ पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. याच हल्ल्यामध्ये जखमी झालेले सिंग यांच्याकडे असणारी गाडी ही चोरीची असल्याचा खुलासा नुकताच झालाय. गाडी सर्व्हिसिंगला पाठवल्याने गाडीच्या सर्व्हिसिंग सेंटरमधील माहितीवरुन पोलीस अधिकाऱ्याकडे असणारी ही कार दोन वर्षांपूर्वी चोरीला गेल्याची माहिती समोर आलीय.

नक्की वाचा >> उत्तर प्रदेश : वर्गात बसण्याच्या जागेवरुन झालेल्या वादातून मित्रावर झाडल्या गोळ्या; १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

ओमेंद्र सोनी या गाडीच्या मालकाला सर्व्हिस सेंटरमधून फोन करुन गाडी पोलीस अधिकाऱ्याकडे असल्याची माहिती देण्यात आली. सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार बारा परिसरातील सर्व्हिस सेंटरमधून ३१ डिसेेबर २०१८ रोजी ही गाडी साफसफाईला दिली असता चोरी झाली होती. या प्रकरणी सोनी यांनी बारा पोलीस स्थानकामध्ये तक्रारही नोंवदली होती. मात्र नंतर ही गाडी सापडलीच नाही.

मात्र ३० डिसेंबर रोजी अचानक सोनी यांना केटीएल सर्व्हिस सेंटरमधून कॉल आला. तुम्ही काही दिवसांपूर्वी सर्व्हिसिंग करुन नेलेली गाडी योग्य पद्धतीने चालतेय ना यासंदर्भात चौकशी करण्यासाठी हा कॉल सर्व्हिस सेंटरमधून करण्यात आल्याचे हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. “हा कॉल आल्याने मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी यापूर्वी माझ्या वॅगनार कारची सर्व्हिसिंग या सेंटरमधून केल्याने सेंटरकडे माझी माहिती असल्याचे सांगण्यात आलं. माहितीच्या आधारेच आम्ही फोन केल्याचे सेंटरमधील कर्मचाऱ्याने सांगितलं,” असं सोनी सांगतात.

नक्की वाचा >> उत्तर प्रदेश: पाकिस्तानी महिलेची ग्रामपंचायत प्रमुखपदी निवड; वर्षभरानंतर प्रशासनाला आली जाग

त्यानंतर सोनी यांनी सर्व्हिस सेंटरला जाऊन चौकशी केली तेव्हा २२ डिसेंबर रोजी त्यांची दोन वर्षापूर्वी चोरीला गेलेली गाडी सर्व्हिसिंग करुन बित्तूर पोलीस स्थानकाचे प्रमुख असणाऱ्या कुशलेंद्र प्रताप सिंग यांना सोपवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पोलिसांना आपली चोरीला गेलेली गाडी सापडल्यानंतरही त्यासंदर्भात आपल्याला का कळवण्यात आलं नाही, यामागील उत्तर जाणून घेण्यासाठी सोनी यांनी पोलीस स्थानकात जाऊन चौकशी केली.

नक्की वाचा >> १ लाख ८९ हजार ३६ झाडांची कत्तल; योगी सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी वृक्षतोड

या संदर्भात बोलताना सिंग यांनी आपला बचाव करत ही गाडी पोलिसांनी जप्त केली होती. रस्त्याच्या बाजूला ही गाडी अनेक दिवस बेवारस उभी असल्याने ती जप्त करण्यात आली होती. मात्र नक्की ही कारवाई कधी करण्यात आलेली यासंदर्भात सिंग यांना ठोसपणे माहिती देता आली नाही. तसेच जप्त केलेली गाडी पोलीस अधिकारी कसे काय वापरु शकतात या प्रश्नालाही सिंग यांनी काहीच उत्तर दिलं नाही. नियमांनुसार बित्तूर पोलिसांनी बारा पोलिसांना या गाडीसंदर्भात माहिती देणं अपेक्षित होतं. मात्र बित्तूर पोलिसांनी अशी कोणतीही माहिती आपल्याला दिली नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सिंग यांना या गाडीचा ताबा कोणी दिला?, यासाठी त्यांनी कोणाची परवानगी घेतली आणि यासारखे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरितच आहेत.

नक्की वाचा >> अभ्यासावरुन पालक ओरडल्याने १४ वर्षीय मुलाने घरातील दीड लाख चोरले अन् गोवा गाठले; क्लबमध्ये पैसे उडवले पैसे

दरम्यान या प्रकरणाने मुळे पोलीस खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी जप्त केलेली गाडी वापरणे नियमांचे उल्लंघन आहे. या प्रकरणाची चौकशी करुन जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर कारवाई केली जाईल असं कानपूरचे आयजी मोहित अग्रवाल यांनी सांगितलं आहे.