लग्नासाठी एखाद स्थळं पक्क करण्याआधी अनेकदा शेजाऱ्यांकडे कुटुंबाबद्दल, मुलाबद्दल चौकशी केली जाते. शेजारी काय सांगतील यावरच अनेकदा समोरील कुटुंब निर्णय घेत असतं. अशीच एक घटना समोर आली आहे जिथे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीमुळे लग्नाची स्थळं परत जाण्याने तरुण संतापला आणि त्याने धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तरुणाने थेट शेजाऱ्याच्या दुकानावर जेसीबी चालवला. केरळमधील कन्नूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. शेजारी दुकानमालक लग्नासाठी येणारी स्थळं परत पाठवत असल्याने अल्बिन नाराज होता. जेसीबीच्या सहाय्याने त्याने संपूर्ण दुकानाची तोडफोड केली असून जमीनदोस्त केलं.

अल्बिनने सोशल मीडियावर जेसीबी चालवतानाचा व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओत दुकानात अनेक गैरप्रकार सुरु असल्याचं तो सांगत आहे. “या दुकानात बेकायदेशीर सट्टा, दारुचा धंदा सुरु होता. परिसरातील आम्ही तरुण यामुळे त्रस्त होतो,” अशी माहिती तो व्हिडीओत देत आहे. वारंवार प्रशासनाकडे तक्रार करुनही दुर्लक्ष केलं जात असल्याचंही तो सांगत आहे.

पुढे तो म्हणतोय की, “पोलीस किंवा गाव प्रशासनाकडून आम्हाला कोणतंही सकारात्मक उत्तर मिळत नसल्याने हे दुकान मी पाडत आहे”. यावेळी अल्बिन आपल्यासाठी येणारे लग्नाचे अनेक प्रस्ताव दुकान मालकाने परत पाठवल्याचं म्हणत आहे. यानंतर अल्बिन जेसीबी चालवत दुकानाची तोडफोड करताना व्हिडीओत दिसत आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अल्बिनला अटक केली आहे. त्याने बेकायेदेशीरपणे दुकानाची तोडफोड केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे.