FIFA 2018 फिफा वर्ल्ड कप २०१८ ला या आठवड्यापासून सुरूवात होतेयं. खरंतर क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलचं वेड ते काय? हे वेगळं सांगायला नको. पण जगभरात सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या खेळात क्रिकेटची नाही तर फुटबॉलची गणना होते हेही मान्य करायला हवं. १४ तारखेपासून फुटबॉल मॅचचा रणसंग्राम सुरू होणार आहे. फुटबॉल चाहत्यांसाठी हा विश्वकप म्हणजे पर्वणीच. जसे आपल्या इथे ‘निस्सीम क्रिकेटवेडे’ आहेत तसेच जगभरात फुटबॉलचे निस्सीम चाहते आहे. हे चाहते आपल्या आवडत्या फुटबॉलपटूला आणि संघाला पाठिंबा देण्यासाठी काहीतरी भन्नाट करण्याचा प्रयत्न करतात. भारतातील अर्जेंटिना संघाच्या चाहत्यानं चक्क आपलं घर या देशाच्या ध्वजाच्या रंगात रंगवलं आहे.

कोलकातमध्ये राहणारे साहिब शंकर पात्रा हे अक्षरश: फुटबॉल वेडेआहे. अर्जेंटिना संघाचे ते चाहते आहेत, त्यातून मेस्सी हा तर त्यांचा सर्वात आवडता फुटबॉलपटू आहे. आणि या संघावरील प्रेमापोटी चहाविक्रेते साहिब यांनी घराला अर्जेंटिनाच्या राष्ट्रध्वजाचा रंग दिला आहे. दुकान देखील फिक्कट आकाशी आणि पांढऱ्या रंगात त्यांनी रंगवलं आहे. पात्रा यांना रशियात जाऊन हा भव्य सामना याची देही याची डोळा पाहायचा होता. पण आर्थिक परिस्थीतीमुळे त्यांना काही शक्य झालं नाही. चहा विक्रिच्या व्यवसायातून काही पैसे त्यांनी वाचवले होते. पण या पैशांत रशियनवारी शक्य नसल्याचं त्यांनी कबुल केलं. त्यांनी यंदाचा सामना पाहण्यासाठी ६० हजार रुपये जमवले होते. पण पात्रा यांचं स्वप्न अपूरचं राहिलं.  अर्जेंटिनाचा सामाना प्रत्यक्षात जाऊन पाहणं जरी त्यांना शक्य नसलं तरी आपलं घर अशा प्रकारे रंगवून त्यांनी संघाला पाठिंबा दर्शवला आहे.