लंडनच्या आकाशात उडणाऱ्या केनिया एअरवेजच्या विमानातून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, हा व्यक्ती लंडनला जाण्यासाठी फुकटात चोरुन प्रवास करत होता अशी माहिती आहे. लपून प्रवास करण्यासाठी तो विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये जाऊन बसला होता.

केन्या एअरवेजचं 787 विमान हिथ्रो एअरपोर्टवर लँडिंग करण्यासाठी खाली येत होते. विमान 3500 फूट उंचावरून लँडिंगसाठी खाली येताना लँडिंग गिअरमध्ये लपलेली ही व्यक्ती विमानातून थेट एका घरासमोरच्या बगीच्यात कोसळली. नैरोबी ते लंडन हा 9 तासांचा प्रवास ही व्यक्ती लँडिंग गिअरमध्ये बसून करत होती. ही व्यक्ती कोसळली त्यावेळी त्या घरातील एक तरुण बगीच्यामध्ये सनबाथ घेत होता. त्याच्यासमोर अवघ्या तीन फुटांवर ही व्यक्ती कोसळली. मी नशीबवान आहे की तो मृतदेह माझ्यावर कोसळला नाही अन्यथा माझाही मृत्यू झाला असता अशी प्रतिक्रिया त्या तरुणाने ‘द सन’सोबत बोलताना दिली. संबंधित तरुण घडलेला प्रकार बघून पुरता हादरुन गेला होता, त्याच्या तोंडून शब्दही निघत नव्हते असं ‘द सन’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे मृत व्यक्ती ज्यावेळी विमानातून बगीच्यात कोसळली तेव्हा जोरदार आवाज झाल्याने शेजारी देखील तेथे आले, घडलेली घटना पाहून ते देखील हादरले. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आलं. ती व्यक्ती एवढ्या जोरात कोसळली की तेथे एक छोटा खड्डा पडल्याचंही सांगितलं जात आहे. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने अंगाचा थरकाप उडाल्याची प्रतिक्रिया अन्य एका व्यक्तीने दिली.