महाराष्ट्रामध्ये मागील काही आठवड्यांपासून जेसीबी चांगलाच चर्चेत आहे. अगदी काल परवा कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या पॉडकास्टला आलेले प्रमुख पाहुणे खासदार संजय राऊत यांना खेळण्यातले जेसीबी भेट दिल्याचेही पहायला मिळालं. मात्र या राजकीय कारणाबरोबरच सध्या आणखीन एका व्हिडीओमुळे जेसीबी सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये जमीन खोदण्यासाठी वापरण्यात येणारी जेसीबी मशिन चक्क पाठ खाजवण्यासाठी वापरली जात असल्याचे दिसत आहे. अर्थात एवढ्या वेगळ्या पद्धतीने जेसीबीचा वापर केल्याने हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

फेसबुकवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ अवघ्या ४१ सेकंदांचा आहे. हा  व्हिडीओ एका बांधकाम सुरु असणाऱ्या ठिकाणी चित्रित करण्यात आल्याचे दिसत आहे. याच ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या ठिकाणी एक माणूस अंघोळ केल्यानंतर पाठ पुसतात त्याप्रमाणे पंचाला पाठ पुरत लुंगी घालून चालत येताना दिसतो. जेसीबीपासून काही अंतरावर थांबून हा माणूस जेसीबीकडे पाठ करुन उभा राहतो आणि फिल्डींग करतात त्याप्रमाणे कंबरेत वाकतो. हे पाहून जेसीबीमधील चालक जेसीबी सुरु करतो. त्यानंतर जेसीबीच्या ज्या हाताने जमीन खोदली जाते, मातीचे मोठे ढिगारे उपसले जातात त्याच हाताने या माणसाची पाठ खाजवली जाते.

हा व्हिडीओ दोन हजार ३०० हून अधिक जणांनी शेअर केला असून त्याला साडेतीन हजारहून अधिक लाईक मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर मजेदार कमेंट दिल्या आहेत. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे ठामपणे सांगता येत नसलं तरी एकंदरित पेहराव आणि गाड्या पाहून हा दक्षिण भारतामध्ये चित्रित करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.