सोशल मीडिया एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कशाप्रकारे बदलतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे रानू मंडल. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणाऱ्या रानूने आपल्या सुरेल आवाजाने नेटकऱ्यांची मनं जिंकली आणि त्यांचा व्हिडीओ अल्पावधीतच तुफान व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून प्रसारमाध्यमांनी त्यांना शोधून त्यांच्या मुलाखतीसुद्धा घेतल्या. इतकंच नव्हे तर रानू यांनी नुकतंच संगीतकार व गायक हिमेश रेशमियासाठी एक गाणं रेकॉर्ड केलं. रानू यांना रातोरात स्टार बनवण्यामागे एका सर्वसामान्य तरुणाचा मोठा वाटा आहे. रानू यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट करणारा हा तरुण आहे.

कोलकाताच्या रानाघाट स्टेशनवर गाणी गाऊन आपल्या जीवनाचा गाडा चालवणाऱ्या रानूसाठी अतिंद्र चक्रवर्ती हा तरुण कोणा देवापेक्षा कमी नाही. पेशाने इंजीनिअर असलेल्या अतिंद्रने रानू यांचा सुरेल आवाज ऐकला आणि एके दिवशी त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रानू यांना मुंबईत घेऊन येणारा व्यक्तीसुद्धा हाच आहे. त्यांना गायनाची संधी देणाऱ्या हिमेशचे अतिंद्रने आभार मानले आहेत.

अतिंद्रने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमुळे रानूच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचंही भरभरून कौतुक होत आहे.