इडली हा अनेकांचा आवडता पदार्थ. दक्षिण भारतात तर इडली मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. तामिळनाडूतील सलेममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे म्हणजेच ‘मोदी इडली’ विकण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. करोना महामारीदरम्यान अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात या इडलीची विक्री करण्यात येणार आहे. केवळ १० रूपयांमध्ये सामान्य लोकांना मोदी इडलीचा आस्वाद घेता येईल. सध्या केवळ तामिळनाडूतील सेलममध्ये या इडलीची विक्री केली जाणार आहे.

पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार मोदी इडली या डिशची संकल्पना ही भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश यांची आहे. याच्या प्रचारासाठी शहराच्या निरनिराळ्या भागांमध्ये मोदी इडलीचे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टर्सवर एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला महेश यांचं छायाचित्र आहे. तसंच १० रूपयांना ४ इडली देण्यात येणार असल्याचंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

१० रूपयांमध्ये ग्राहकांना ४ मोदी इडली देण्यात येणार आहेत. तसंच यासोबत सांबारही दिला जाईल. याव्यतिरिक्त मॉडल किचनमध्ये या इडली तयार केल्या जातील, असंही त्यावर नमूद करण्यात आलं आहे. “मोदी इडलीच्या विक्रीसाठी २२ दुकानं सुरू करण्याची योजना आखली आहे. या योजनेला यश मिळाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढवली जाईल,” असं मत तामिळनाडू भाजपाचे माध्यम सचिव आर. बालासुब्रमण्यम यांनी व्यक्त केलं.

यापूर्वीही तामिळनाडूतील एका ४८ वर्षीय व्यक्तीनं वेकटचलपुरम गावात राहणाऱ्या लोकांना स्वस्त खाणं उपलब्ध व्हावं यासाठी १ रूपयांमध्ये इडलीची विक्री केली होती. एम. पलानीसामी असं त्यांचं नाव असून ते वेंकटचलपुरम पंचायतीचे अध्यक्ष आहेत.