सरकारी टेलिकॉम कंपनी एमटीएनएल(महानगर टेलिफोन निगम लिमिटेड)ने अधिकृत ट्विटर हँडलवरुन गुरूवारी(दि.20) केलेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर गोंधळ निर्माण झाला. बघता बघता लोकांनी MTNL च्या ट्विटवर रिप्लाय द्यायला सुरूवात केली आणि थोड्याचवेळात त्या ट्विटमुळे MTNL ट्रोल व्हायला सुरूवात झाली.

(डिलिट केलेल्या ट्विटचा स्क्रिनशॉट)

काय आहे प्रकरण –
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची पत्नी निता अंबानी यांच्या नावाने असलेल्या एका फेक अकाउंटवरुन हिंदी भाषेत एक ट्विट करण्यात आलं होतं. आज गोडसेला समर्थन देण्यासही हिंदूंना भीती वाटते, तर काही मुसलमान लोकं आपल्या मुलांची नावं तैमुर ठेवून देखील अभिमान बाळगतात. असं ट्विट त्या फेक अकाउंटवरुन केलं होतं. एमटीएनएलने हे ट्विट ‘सच को पचाना मुश्किल है’ असं कमेंट करुन पुन्हा शेअर केलं. त्यानंतर युजर्सच्या नजरेस हे पडलं आणि तिखट प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली.

यावर सलमान खान नावाच्या एका ट्विटर युजरने तर, ‘आजकाल गोडसे एमटीएनएलद्वारे सत्य पचवतोय का’ असं ट्विट केलं. तर सीफर नावाच्या एका ट्विटर हँडलवरुन, ‘एमटीएनएलचं अकाउंट भाजपाचे ट्रोलर्स चालवत असल्याचं’ ट्विट केलं. अनेकांनी एमटीएनलचं अकाउंट हॅक झाल्याची शक्यताही वर्तवली. दीप प्रकाश पंत नावाच्या एका ट्विटर युजरने, ‘भाजपा आयटी सेलमधून कोणीतरी ट्विट करण्याआधी हँडल बदलण्यास विसरलंय असं म्हटलं.

अखेरीस मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्यानंतर कंपनीने ते ट्विट डिलिट केलं. तसंच, आपण पासवर्ड बदलला असून ट्विटर हँडलसोबत छेडछाड झाली आहे आणि चौकशीसाठी ट्विटर इंडियाशी संपर्क केल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.