करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. लॉकडाउनचा चौथा टप्पा संपल्यानंतर केंद्र सरकारने देशाच्या विविध भागात परिस्थितीचा अंदाज घेत काही गोष्टी सुरु करण्याची परवानगी दिली आहे. लॉकडाउन काळात देशातील कामगार व मजुरांचा चांगलाच त्रास झाला. अखेरीस केंद्र सरकारने या मजुरांसाठी रेल्वे गाड्यांची सोय केली. मात्र या लॉकडाउन काळात अनेक पाळीव प्राणी आपल्या मालकांपासून दूर अडकले आहेत. अशा प्राण्यांसाठी मुंबईत सायबर सिक्युरिटी रिसर्चर म्हणून काम करणाऱ्या दिपीका सिंह यांनी चक्क खासगी जेट विमान बूक केलं आहे. या विमानात पाळीव प्राण्यांसाठी ६ जागा असून आतापर्यंत ४ जागा भरल्या गेलेल्या आहेत. यात ३ कुत्रे आणि एका पक्ष्याचा समावेश आहे. मात्र या जागेसाठी त्यांना १.६ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. अजुन दोन प्राण्यांसाठी हे विमान थांबलेलं असल्याचं कळतंय.

प्रसारमाध्यमांशी बोलताना दिपीका यांनी त्यांना ही कल्पना कशी सुचली याबद्दल सांगितलं. “मी माझ्या नातेवाईकांसाठी दिल्लीवरुन मुंबईला येण्यासाठी चार्टर्ड विमानाची सोय होते का हे पाहत होते. मात्र त्यावेळी पाळीव प्राणी सोबत असतील तर इतर प्रवासी नकार देत असल्याचं समजलं. यावेळी प्राण्यांसाठी वेगळं विमान बूक करण्याची संकल्पना मला सूचली, आणि एक खासगी कंपनी यासाठी तयारही झाली.” सध्या केंद्र सरकारच्या परवानगीनंतर राज्यांतर्गत विमान सेवा सुरु करण्यात आलेली आहे.

दरम्यान या प्राण्यांना विमानातून मुंबईला आणण्यासाठी सर्व नियमांचं तंतोतंत पालन होणार असल्याचं कळतंय. या प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवणार असल्याचं कळतंय. प्राण्यांना घेऊन प्रवास करण्यासाठी वेगळ्या परवानगीची गरज लागत नसल्याचंही एका नागरी उड्डाण मंत्रालयातील अधिकाऱ्याने दिली. लॉकडाउन काळात दुसऱ्या राज्यात अडकलेल्या माणसांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी अनेक जणं पुढे आल्याचं आपण पाहिलं. सोनू सुदसारख्या कलाकारांनी आपल्या पदरचे पैसे टाकत या कामगारांना रेल्वे, बस, विमानाने घरी पाठवलं. परंतू पाळीव प्राण्यांसाठी खास विमानाची सोय करण्यात आल्याची कदाचीत ही पहिलीच घटना असावी.