मुंबई पोलीस आपल्या ट्विटमुळे आणि हटके उत्तरांमुळे कायम चर्चेत असतात. आताही ते चर्चेत आले आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांनी एका महिलेच्या घरी चक्क वाढदिवसाचा केक पाठवला आहे. मुंबईच्या रहिवासी असलेल्या समिता पाटील यांचा काल वाढदिवस होता. त्यामुळे त्यांच्या सर्व मित्रमैत्रिणी त्यांना पार्टी मागत होत्या. मात्र समिता यांनी त्यांना लॉकडाऊन असल्याने घरातच राहायचा सल्ला दिला. त्याबद्दल त्या मुंबई पोलिसांच्या कौतुकास पात्र ठरल्या आहेत.

समिता यांनी हा संपूर्ण घटनाक्रम आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमैत्रिणींनी समिता यांना पार्टी मागितली. त्यावर समिता यांनी “लॉकडाऊन आहे, त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा” असं उत्तर दिलं. आपल्या ह्या गप्पा त्यांनी मुंबई पोलिसांसोबतही शेअर केल्या. त्यावर मुंबई पोलिसांनी त्यांचं कौतुक केलं आणि त्यांच्याकडे त्यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मागितला. तसंच जबाबदार नागरिकाचं कर्तव्य पार पाडल्याबद्दल त्यांचं कौतुक करणारा एक मेसेजही पाठवला.

यानंतर समिता यांना मुंबई पोलिसांनी एक चॉकलेट ट्रफल केक त्यांच्या घरी पाठवला ज्यावर Responsible Citizen असं लिहिलं होतं. मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती आणि या केकचा फोटो शेअर केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “तुमच्या खास दिवशी घरी राहिल्याबद्दल आणि जबाबदार नागरिकाचं कर्तव्य पार पाडल्याबद्दल आमच्याकडून तुमच्या कौतुकाचा हा छोटासा प्रयत्न. आजचं तुमचं हे सुरक्षित सेलिब्रेशन आपल्या शहराला उद्या आनंदी कऱेल. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

मुंबई पोलिसांच्या या ट्विटची चर्चा आता चांगलीच होत आहे. यापूर्वीची त्यांची बरीच ट्विटही चर्चेचा विषय ठरली होती. आता हे ट्विट आणि ही कृती नेटकऱ्यांनी चांगलीच उचलून धरली आहे.