पावसाळ्याची सुरुवात म्हणजे आकाशात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट! दरवर्षी वीज पडून अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. अनेकांच्या संपत्तीचे नुकसान होते. आकाशात चमकणारी वीज मोजता येत नाही, परंतु ती लाखो मेगावॅटची असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. आता ही वीज आकाशात कशी तयार होते व या विजेपासून सुरक्षितता कशी बाळगली पाहिजे याबद्दचे अनेक सल्ले आणि लेख अनेकदा वाचनात येतात. मागील काही दिवसांपासून भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये वीज पडून अनेकजण मृत्यूमुखी पडल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. एकाद्या झाडावर वीज पडल्याचे किंवा इमारतीवर वीज पडल्याचे व्हिडिओही व्हायरल होता असतात. मात्र आता थेट अंतराळामधून वीज कशी दिसते हे दाखवणारा एक व्हिडिओ अंतराळवीराने पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

नक्की पाहा >> Video: सरावादरम्यान १६ वर्षीय फुटबॉलपटूच्या अंगावर पडली वीज

नॅशनल अ‍ॅस्ट्रोनॉटीक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाचा अंतराळवीर बॉब बेहकीन याने वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासहीत पडणारी वीज अंतराळामधून कशी दिसते हे दाखवणारा व्हिडिओ ट्विट केला आहे. मागील काही आठवड्यांपासूनच बातम्यांमध्ये असणाऱ्या स्पेस एक्समधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या बॉबने पृथ्वीवर पडणारी वीज पृथ्वीपासून शेकडो किमीवरुन कशी दिसते याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. बॉबने शेअर केलेल्या या ९ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये काळ्या ढगांमध्ये चमकणाऱ्या विजा दिसत आहेत. “वरुन अशी दिसते वीज. त्या व्हायलेट फ्रिंज (विजेच्या उपशाखा) थक्क करणाऱ्या आहेत,” असं बॉबने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे.

नक्की पाहा >> भन्नाट… अंतराळामधून असं दिसलं सूर्यग्रहण; पाहा अंतराळवीर, सॅटेलाइट्सने शेअर केलेले फोटो आणि GIF

बॉबने पोस्ट केलेला हा व्हिडिओ दोन हजारहून अधिक जणांनी रिट्विट केला आहे. तर दीड लाखांहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला आहेत. रविवार २१ जून रोजी झालेल्या सूर्यग्रहणाचे फोटोही जून महिन्यामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर काम करणाऱ्या क्रीस कॅसडी या अंतराळवीराने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केले होते. अंतराळातून सूर्यग्रहण कसं दिसतं हे दाखवणारे फोटो आणि जीफ चांगल्याच व्हायरल झालेल्या.