टीव्ही हे एक असं माध्यम आहे जे लोकांना प्रचंड प्रमाणात आवडतं, मात्र या छोट्या पडद्यामागेही काही गंमती जंमती घडत असतात. एखादा टीव्ही शो ऑन एअर जात असताना नेमकं काय घडू शकतं? याचे अनेक व्हिडिओ यू ट्युब किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्हायरल होत असतात. असाच एक धमाल व्हिडिओ आमच्या हातीही लागला आहे. हा व्हिडीओ आहे जॉर्डनमधले राजकीय विश्लेषक माजिद असफोर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

या व्हिडिओत माजिद हे कोट शर्ट आणि टाय लावून बसले आहेत. मात्र त्यांनी पँट घातलेली नाही तर फक्त एक शॉर्ट पँट घालून त्यावरच त्यांनी शर्ट घातला आहे, टाय लावला आहे आणि कोटही परिधान केला आहे. त्यांच्या टीव्हीवरच्या ‘ऑफिशियल फ्रेम’मध्ये हे लक्षात येत नाही. कारण त्यांची टीव्हीवर असलेली त्यांची कॅमेरा फ्रेम ही क्लोज शॉटमध्ये लावण्यात आली आहे. त्यामुळे त्यात माजिद हे व्यवस्थित सुटाबुटात बसले आहेत असं वाटतं.

‘अल जझिरा’ या वाहिनीवर माजिद हे अत्यंत गांभिर्यानं बोलताना दिसत आहेत. आपली मतं व्यक्त करत आहेत, अमानमध्ये काय स्थिती आहे, इस्त्रायलींकडून कसा गोळीबार केला जातो आहे याबाबत ते बोलत आहेत. मात्र माजिद यांच्या क्लोज फ्रेममागे जे दृश्य आपल्याला व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं ते पोट धरून हसवणारं आहे.

माजिद यांचा मुलगा मनाफ यानेच आपल्या वडिलांचा हा व्हिडिओ तयार केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोफ्यावर शॉर्ट, शर्ट इन करून त्यावर टाय आणि कोट घालून बसलेले माजिद आणि टीव्हीवर दिसणारे माजिद असा हा व्हिडिओ आहे. ते आपला लॅपटॉप घेऊन सोफ्यावर बसले आहेत आणि त्यांनी आपल्या मांडीवर दोन ते तीन उशा घेतल्या आहेत. कार्यक्रमात बोलावण्यात आलेले पाहुणे हे व्यवस्थित कपडे घालण्याची औपचारीकता पाळतात हा समज या व्हिडिओनं खोडून काढला आहे.

अमानमधील तापमान ३० अंश आहे त्यात मी घरी आहे त्यामुळे शॉर्टवरच शर्ट, कोट आणि टाय लावायचं ठरवून चर्चेत सहभागी झालो आहे अशी प्रतिक्रिया माजिद असफोर यांनी दिली आहे. त्यांचं कारण काहीही असलं तरीही हा व्हिडिओ पाहिला की आपण खो खो हसू लागतोच.

तुम्हीही पाहा हा व्हिडिओ