19 March 2019

News Flash

उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडला अवाढव्य व्हेल मासा

३५ ते ४० फूट लांबीचा असल्याची शक्यता

समुद्रकिनाऱ्यावर एखादा मोठा मासा वाहत येण्याच्या घटना आता फारशा नवीन नाहीत. मागच्या काही वर्षात भारतातही या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. नुकताच रायगड जिल्ह्यातील उरण येथे एक अवाढव्य व्हेल मासा आढळून आला आहे. उरणच्या पश्चिम किनारपट्टीवर काहीशा कुजलेल्या अवस्थेत हा मासा आढळला. आता तो मासा नेमका कशामुळे मेला आणि कधी याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा मासा जवळपास ३५ ते ४० फूट लांबीचा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खारदंडा याठिकाणी मृत अवस्थेत हा भलामोठा व्हेल मासा दिसल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. या माशाचे तोंड कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधीही पसरली होती. एका व्हेल माशाचे वजन हे काही टनात असते. तो जेव्हा किनाऱ्यावर वाहून येतो तेव्हा त्याचे वजन त्याला पेलता येत नाही. हे वजन पाण्यात पोहताना माशाला जाणवत नाही मात्र जमिनीवर जाणवते. त्यामुळे जमिनीवर आपल्याच वजनाखाली या माशांच्या शरीरातील सगळे अवयव दबले जाऊन अक्षरक्ष: फुटतात असं सांगितलं जातं.

सहा वर्षांपूर्वी उरणच्या पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर हंपव्हेल प्रजातीचा सुमारे ४० फूट लांब मासा मृतावस्थेत आढळून आला होता. तर, दांडा गावाच्या हद्दीतही गेल्या दोन वर्षांपूर्वी कुजलेल्या अवस्थेतील व्हेल मासा आढळला होता. याआधी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मालवणच्या किनाऱ्यावर एक देवमासा वाहत आला होता. हा मासा ३० फूटांहून जास्त लांब होता. स्थानिक माच्छिमारांना रात्रीच्या सुमारास देवमाशाचा मृतदेह किनारी भागात तरंगताना दिसला. त्यानंतर तो वाहून किनाऱ्यावर आला होता.

First Published on June 14, 2018 1:41 pm

Web Title: raigad uran 35 40 ft long whale fish found at sea shore