बहिण भावाचं नातं हे अतूट असतं, कोणात्याही सीमा, धर्म, जात पात हे नातं तोडू शकत नाही, म्हणूनच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत कितीही वितुष्ट असले तरी पाकिस्तानी बहिणीची मोदींवर असलेली माया आजही कामय आहे. रक्षाबंधननिमित्त मोदींना राखी बांधण्यासाठी त्यांची मानलेली बहिण दिल्लीत आली आहे. कमर मोहसिन शेख असं त्यांचं नाव असून त्या मुळच्या पाकिस्तानच्या आहेत. पण लग्नानंतर त्या भारतात आल्या आणि इथेच स्थायिक झाल्या. तेव्हापासून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधत आहेत असं त्या ‘एएनआयला’ दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि माझी काही वर्षांपूर्वी दिल्लीत भेट झाली होती. ते स्वभावाने खूपच चांगले आहेत. कधीतरी माझी आणि त्यांची भेट होते. ते माझी आपुलकीने चौकशी करतात आणि गेल्या ३६ वर्षांपासून मी त्यांना राखी बांधत आहे असं कमर यांनी सांगितले. मोदी संघाचे कार्यकर्ते असल्यापासून आपण त्यांना राखी बांधत आहोत, पण गेल्या काही वर्षांत मोदी आपल्या कामात खूपच व्यग्र होते त्यामुळे गेल्या काही काळात आपली आणि त्यांची भेट झाली नाही, पण दोन दिवसांपूर्वीच त्यांनी फोन करून मला दिल्लीला रक्षाबंधनसाठी आमंत्रण दिलं’ असंही त्या म्हणाल्या. मोदींना राखी बांधण्यासाठी त्या दिल्लीत आल्या आहेत.