11 December 2017

News Flash

दरोड्यासाठी त्यांनी गुंतवले ९ कोटी; पण अखेर डाव फसलाच

ठरला असता जगातील सर्वात मोठा दरोडा

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 5, 2017 4:05 PM

धूम आणि आँखे चित्रपट आठवतोय? यामध्ये ज्याप्रमाणे दरोडा टाकला जातो तसाच काहीसा कट ब्राझिलमधील दरोडेखोरांनी रचला मात्र तो असफल झाला. पोलिस याठिकाणी वेळेवर पोहोचल्यामुळे हा कट फसला. पण जर तो यशस्वी झाला असता तर तो जगातील सर्वात मोठा दरोडा ठरला असता. त्यामुळे खूप मोठी हानी टळली असल्याचे म्हणता येईल. त्यामुळे पोलिसांना आपल्या कामात यश मिळाले आहे असे म्हणता येईल. या दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.

हे दरोडेखोर मागच्या चार महिन्यांपासून एका बँकेवर दरोडा टाकण्याचा कट आखत होते. यामध्ये १६ जणांचा समावेश होता. विविध स्तरावर अतिशय कसोशीने काम करत होते. ब्राझीलमधल्या साओ पाओलो येथील बॅंक लुटण्याचा त्यांचा प्लॅन होता. यातील आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे या दरोड्यासाठी त्यांनी ४ कोटी रियाल म्हणजे ८. २६ कोटी रूपये स्वतः गुंतवले होते. या दरोड्याच्या कामासाठी दरोडेखोरांनी एक घरही भाड्याने घेतले होते. या घरातूनच त्यांनी एक भुयार खोदण्यास सुरूवात केली. ६०० मीटर लांब भुयार त्यांनी तयार केले. या भुयारातून बॅंकेच्या लॉकरपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा कट होता. भुयारात प्रकाश यावा यासाठी बल्बची देखील व्यवस्था त्यांनी केली होती. याशिवाय माती पडून भुयार ब्लॉक होऊ नये यासाठी त्यांनी लोखंडाचाही सपोर्ट दिला. आता दरोड्यासाठी दरोडेखोर काय काय करतात याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.

आता इतके सगळे प्लॅनिंग झाल्यावर हा कट यशस्वी होण्याचीच शक्यता जास्त होती. मात्र ऐनवेळी पोलिसांना दरोड्याच्या कटाची कुणकुण लागल्याने दरोड्यापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर असताना पोलिसांनी हा कट उधळला. बॅंकेतून जवळपास दोन हजार कोटी रूपये लुटण्याचा त्यांचा डाव होता. जर हा दरोडा टाकण्यात त्यांना यश आलं असतं तर तो जगातला बॅंकेवर टाकलेला सर्वात मोठा दरोडा ठरला असता असं बोललं जात आहे.

First Published on October 5, 2017 2:00 pm

Web Title: robber invested 9 crores rupees for robbing bank in brazil