उन्हाळा सुरू झाल्यामुळे सध्या सर्वांचाच कल थंड पेयाकडे आहे. आता रमजान महिनाही सुरू झालाय, बाजारात विविध प्रकारचे थंड पेय उपलब्ध आहेत पण अनेक वर्षांपासून भारतीयांच्या पसंतीस पडलेलं रूह अफजा हे सरबत मात्र बाजारातून गायब आहे. विशेषतः रमजानच्या महिन्यात मुस्लिम लोक दिवसभर रोजा पकडतात आणि सायंकाळी इफ्तारची सुरुवात रुह अफजा सरबतानेच होत असते. पण यंदा हे सरबत बाजारातच उपलब्ध नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावरदेखील याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. सोशल मीडियातील चर्चेमुळे भारतीय बाजारातून रुह अफजा गायब असल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं आणि त्यावर आता पाकिस्तानमधून प्रतिक्रिया आली आहे.

आम्ही पवित्र रमजान महिन्यात भारताला रुह अफजाचा पुरवठा करु शकतो. जर भारत सरकारने यासाठी परवानगी दिली तर वाघा बॉर्डरच्या मार्गे आम्ही भारतात रुह अफजाचा पुरवठा करण्यास तयार आहोत. असं हमदर्द कंपनीचे पाकिस्तानमधील प्रमुख उसामा कुरैशी यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, भारतातील हमदर्द कंपनीचे संस्थापक हकीम हाफिज अब्दुल मजीद यांचे नातू अब्दुल मजीद आणि त्यांचे चुलत भाऊ हामिद अहमद यांच्यात कंपनीच्या ताब्यावरून वाद सुरू आहेत, त्यामुळे रुह अफजाचा पुरवठा थांबल्याची चर्चा आहे. पण काही हर्बल सामानाच्या पुरवठ्यात आम्हाला कमतरता जाणवत आहे. लवकरच मागणी आणि पुरवठ्यातलं हे अंतर कमी होईल. आम्ही खूप महिन्यांचा कच्चा माल साठवून ठेवतो. पण यावेळी तो कमी पडला. जे हर्बल्स आम्ही वापरतो, ते सहज सगळीकेड उपलब्ध होत नाहीत. जवळपास 15 एप्रिल पासून रुह अफजाचं उत्पादन पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. काही आठवड्यांमध्ये रुह आफजा दुकानांमध्ये पुन्हा उपलब्ध होईल असं हमदर्दचे मार्केटिंग आणि सेल्सचे चीफ ऑफिसर मन्सूर अली यांनी सांगितलं.