सध्या संपूर्ण जग करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत आहे. लॉकडाउन काळात घरातील वृद्ध व्यक्तींना अनेक हालअपेष्टांना सामोरं जावं लागत आहे. समाजातील अनेक लोकं अशा गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. १ जून हा दिवस संपूर्ण जगात ग्लोबल डे ऑफ पॅरेंट्स म्हणून साजरा केला जातो. आपल्या पालकांविषयी आपलं प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २०१२ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या दिवशी भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने आपल्या आई-वडिलांसोबतचा जुना फोटो शेअर करत सर्वांना एक भावनिक आवाहन केलं आहे.

आई-वडिलांनी आपल्यासाठी जे कष्ट सोसले त्यामुळे आपण आज प्रगती करु शकलो. माझ्या जडणघडणीत माझ्या आई-बाबांचा मोठा वाटा आहे. सध्याच्या खडतर काळात आपल्या पालकांना आपली सर्वात जास्त गरज आहे. त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे, अशा आशयाचा संदेश सचिनने आपल्या फेसबूक अकाऊंटवर लिहीला आहे.

करोनाविरुद्ध लढ्यातही सचिन तेंडुलकरने सक्रीय सहभाग घेतला आहे. पंतप्रधाव व मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यापासून अनेक गरजू व्यक्तींना अन्नदानही सचिनने केलं आहे. याचसोबत अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या स्वच्छताविषयक जनजागृती कार्यक्रमातही सचिन सहभागी झाला होता.