जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या चेहऱ्याशी साधर्म्य असणारा चेहरा असल्याचा काय काय फायदा होऊ शकतो तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्हाला राजकीय प्रचारसभांमध्ये स्टार प्रचारक म्हणून बोलवले जाऊ शकते, एखाद्या नव्या लघुउद्योगाचे उद्घाटन तुमच्या हस्ते होऊ शकते किंवा अगदी एखाद्या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून तुम्हाला आमंत्रण मिळू शकते. असंच काहीतरी सध्या झालं आहे सौरभ गाडे या मराठमोळ्या तरुणाबरोबर.

विराटासारखा दिसणारा सौरभ हा खरं तर जेसीबी या लोकप्रिय बांधकाम वाहन निर्मिती कंपनीमध्ये कनिष्ठ अभियंता पदावर कामाला आहे. मात्र मध्यंतरी एका आमदाराने लोकसभा निवडणुकींसाठी त्याला विराट कोहलीचा डुप्लिकेट म्हणून प्रचारसभेला बोलवलं आणि त्याचं आयुष्यच बददलं. नुकतीच सौरभने विराट म्हणून एक फोटोशूट केले. विराट कोहली ज्या ब्रॅण्डच्या कपड्यांची जाहिरात करतो त्या ब्रॅण्डला सामान पुरवणाऱ्या एका छोट्या कापड्याच्या कंपनीने सौरभला घेऊन नुकतेच एक फोटोशूट केले.

मे महिन्यामध्ये महाराष्ट्रातील शिरुर तालुक्यातील रामलिंगा येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभ्या असणाऱ्या सरपंचाने माझ्या प्रचारासाठी विराट कोहली येणार असल्याचे बॅनर लावले. २५ मे रोजी रॅली काढणार असल्याचे या होर्डींगवर नमूद करण्यात आले होते. त्यामुळे विराटबरोबर सेल्फी काढण्यासाठी, त्याचे ऑटोग्राफ घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. मात्र या सर्वांचा अपेक्षाभंगच झाला. खऱ्या कोहलीऐवजी सरपंचांनी सौरभला लोकांसमोर उभे केले. विराटप्रमाणेच चेहरेपट्टी असणाऱ्या सौरभने विराटसारखीच दाढी ठेऊन त्याच्यासारखाच चष्मा घातल्याने तो हुबेहुब विराटच वाटत होता. मात्र यानंतर ही मिरवणूक चर्चेचा विषय ठरली होती. अनेकांनी सौरभला आणि सरपंचांना सोशल नेटवर्किंगवरुन ट्रोल केले होते.

या पहिल्या रॅलीचा अनुभव आणि त्यानंतर बदललेल्या आयुष्याबद्दल सौरभने ‘इंडियन एक्सप्रेस’शी गप्पा मारल्या. ‘मी विराट कोहलीसारखा दिसतो असं माझे कॉलेजचे मित्र अनेकदा सांगायचे. माझ्या एका मित्राने माझ्याबरोबर काढलेला सेल्फी शिरुरमधील एखा आमदाराला दाखवला. त्या आमरादाराने मला फोन करुन सरपंचांसाठी प्रचार सभेत जाण्यास सांगितले,’ अशी आठवण सौरभ सांगतो. ‘मी या प्रचारासाठी बनवण्यात येणाऱ्या होर्डींगवर छापायला माझे काही फोटो आमदाराच्या पीआर टीमला पाठवले होते. मात्र त्यांना अधिक मोठ्या आकाराचे फोटो हवे असल्याने त्यांनी विराटचे फोटो एडीट करुन वापरले,’ अशी मजेदार आठवणही सौरभने सांगितली.

एका रॅलीमुळे आपल्याला एवढी प्रसिद्धी मिळेल असं वाटलं नव्हतं अशी प्रांजळ कबुली सौरभ देतो. पुण्यापासून 25 किलोमीटरवर असलेल्या सौरभच्या येलावाडी देऊ गावामध्ये तर आता सौरभला ‘देहूचा विराट’ नावाने ओळखतात. सौरभचे वडील हे निवृत्त सैनिक असून आई शिक्षिका आहे. तर सौरभचा लहान भाऊ रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. सौरभ सध्या त्याला मिळत असणाऱ्या प्रसिद्धीचा आनंद घेत असल्याचे सांगतो. ‘अनेकजण माझ्याभोवती फोटो आणि स्वाक्षऱ्यांसाठी गराडा घालतात. मला काही कंपन्यांनी जाहिरातींच्या ऑफर्सही दिल्या आहेत. तसेच या रॅलीनंतर प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमाला मला आवर्जून आमंत्रित केले जाते. इतकचं नाही अनेक लहान-मोठ्या क्रिकेट स्पर्धांसाठी मला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केले जाते,’ असं सौरभ आनंदाने सांगतो. पुण्यामधील एका बेकरीने सौरभबरोबर करार केला असून त्याचे फोटो वापरुन ते केक विकत आहेत. आता विधानसभा निवडणुकींचा प्रचार जोरात सुरु असतानाच सौरभलाही प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक पक्षांकडून विचारणा होत आहे.

विराटशी अद्याप भेट नाहीच पण

ज्याच्यामुळे सौरभला प्रसिद्धी मिळाली आहे त्या विराट कोहलीला सौरभ अद्याप भेटलेला नाही. मागील वर्षी पुण्यामध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी सामना झाला होता त्यावेळी त्याने कोहलीला भेटण्याचा प्रयत्न केला होता. सौरभ टीम इंडियाच्या बस पार्क केली जाते तिथे उभा राहून कोहलीची वाट पाहत होता. मात्र धोनीने त्याला पाहिल्यानंतर विराट मागून येत असल्याचे सांगितले. पण सौरभ आणि विराटची चुकामूक झाली आणि बस निघून गेली. ‘मी आजही विराटला भेटण्याची वाट पाहत आहे,’ असं सौरभ सांगतो. सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ पुण्यामध्ये दाखल झाला आहे. या वेळी विराटला भेटण्याचा सौरभचा प्रयत्न आहे.

पोलिसांनाही फोटो काढला

मात्र या सामन्यानंतर सौरभला विराटला भेटता आले नसले तरी संपूर्ण सामन्यामध्ये अनेक क्रिकेट चाहत्यांनी सौरभबरोबर सेल्फी काढले. सौरभभोवती एवढी गर्दी झाली की पोलिसांच्या मदतीने त्याला त्यामधून बाहेर पडावे लागले.

‘गर्दी वाढल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलिसांनी मला अपंगांसाठी असलेल्या खास रुममध्ये इतरांपासून वेगळे बसण्यास सांगितले. मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे संपूर्ण सामना तिथेच बसून पाहिला. यावेळी दोन हवलदार आणि एक पोलीस निरिक्षक माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. सामना संपल्यानंतर एक वरिष्ठ पोलीस अधिकारी तेथे आले आणि त्यांनीही माझ्याबरोबर फोटो काढला,’ असं सौरभ सांगतो.