बॉलिवूडमध्ये चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख असलेल्या शशी कपूर यांचं सोमवारी दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या लाडक्या शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली, पण श्रद्धांजली वाहण्याच्या नादात काहींनी चुकून काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनादेखील श्रद्धांजली वाहिली. थरूर यांच्या कार्यालयात सांत्वन करणारे फोन येऊ लागल्यानंतर शेवटी वैतागलेल्या थरूर यांनी ट्विट करत माझ्या मरणाच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्या तरी मी ठणठणीत बरा आहे, अशा आशयाचं ट्विट करत लोकांना चूक निदर्शनास आणून दिली.

ब्रेकिंग न्यूज देण्याच्या नादात एका इंग्रजी वृत्तवाहिनीनं शशी कपूर यांच्याऐवजी शशी थरूर यांच्या निधनाची बातमी दिली. यामुळे सगळा घोळ झाला. शेवटी ट्विट करत ‘मी ठणठणीत बरा आहे, माझ्या कार्यालयात अनेक पत्रकारांचे फोन येत आहे. सांत्वन करणारेही फोन येत आहे. पण, मी अजूनही जिवंत आहे. मला वाटतं आता फक्त माझ्या शरीराचा एक भाग निकामी झाला आहे. एका चांगल्या, देखण्या चतुरस्त्र अभिनेत्याचं आज निधन झालं, माझं आणि त्यांचं नाव एकसारखं असल्यानं नेहमीच लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. पण, मला शशी कपूर यांची आठवण नेहमीच येत राहिल.’ अशा आशयाचं ट्विट करत त्यांनी आपल्या निधनाच्या बातमीला पूर्णविराम लावला.

फक्त वृत्तवाहिनीच नाही तर अनेक नावाजलेल्या लोकांनीही शशी कपूरऐवजी शशी थरूर यांना श्रद्धांजली वाहिली. अखेर थरूर यांच्या ट्विटनंतर सगळ्यांनी त्यांची माफी मागत हे प्रकरण तिथेच थांबवलं. पण, या गोष्टीची चर्चा मात्र सोशल मीडियावर पाहायला मिळाली.