राज्यातील रस्त्यांवरील खड्यांमुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या. पण, यावर उपाययोजना करण्यास सरकार अपयशी ठरल्याचं नेहमीच समोर आलं आहे. पावसाळा आणि खड्डे हे तर राज्याचं ठरलेलं समीकरण, मुसळधार पावसानंतर तर खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा असा प्रश्न वारंवार विचारला जातो आणि आपण केवळ रस्त्याच्या आणि खड्ड्यांच्या नावाने बोटं मोडत असतो.

पण, राज्यातील विचित्र, ओबडधोबड रस्त्यांचा आणि त्यावरील खड्ड्यांचा फटका केवळ सामान्यांनाच बसतो असं नाही. प्रसीद्ध स्तंभलेखिका आणि भाजपाच्या वैचारिक पाठीराख्या शेफाली वैद्य या देखील राज्यातील रस्त्यांमुळे त्रस्त झाल्यात. खराब रस्त्यांबाबतची एकप्रकारे थेट तक्रारच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यांच्या रस्त्यांची स्थिती किती खराब आहे हे त्यांनी ट्विटरद्वारे मांडलं आहे.

‘सरकार कोणतंही सत्तेत असो पण महाराष्ट्रातील रस्ते इतके खराब का? गुजरातमध्ये उत्तम रस्ते आहेत. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू येथेही चांगले रस्ते आहेत. इतकंच काय राजस्थान आणि ओडिशा या राज्यांमधील रस्ते देखील मस्त आहेत. पण महाराष्ट्रात आल्यावर तुम्हाला चंद्रावर आल्याचा आभास होतो, आणि हे काही मी चांगल्या अर्थाने म्हणत नाहीये…’, अशा आशयाचं ट्विट करत शेफाली वैद्य यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही त्यात टॅग केलं आहे. चंद्रावरील प्रवासाचा अनुभव महाराष्ट्राच्या रस्त्यांवर येतो अशी बोचरी टीका अप्रत्यक्षपणे त्यांनी केली आहे.


खड्डे बुजविण्यासाठी आणि रस्ते बांधणीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही केला जातो. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांचा प्रश्न काही सुटलेला नाही. आता शेफाली वैद्य यांनी खराब रस्त्यांचं गार्हाण मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्यानंतर तरी रस्त्यांची स्थिती थोडीफार का होईना सुधारली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.