चीनचे प्रसिद्ध ओपेरा सिंगर लिउ केकिंग (Liu Keqing) यांचा चेहरा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी मिळताजुळता आहे. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर निर्बंध घालण्यात आल्याचं समोर आलं आहे.

63 वर्षीय लिउ केकिंग बर्लिनमध्ये राहतात, पण ते ओपेरा गातानाचे अनेक व्हिडिओ टिकटॉकवर सतत अपलोड करत असतात. टिकटॉकवर त्यांचे 41 हजारांहून जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांना टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासही मनाई करण्यात आली आहे. शिवाय त्यांचं Douyin अकाउंटही गेल्या वर्षात अनेकदा बंद करण्यात आलं आहे. दुसरं Douyin अकाउंट बनवलं, पण तेही थोड्यावेळानंतर डिलीट झालं असं लिउ यांनी न्यू-यॉर्क टाइम्सशी बोलताना सांगितलं. माझ्या आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या चेहऱ्यात साम्य आहे, त्यामुळे माझं Douyin अकाउंट बंद केलं आहे. मी अनेकदा माझी ओळख, माहिती चीन सरकारला दिली आहे. आता अकाउंट पुन्हा सुरू होण्याची वाट बघतोय असं लिउ म्हणाले.

राष्ट्राध्यक्षांच्या प्रतीष्ठेचं कारण देत उचललेल्या अनेक पावलांवरुन चीनवर यापूर्वीही अनेकदा टीका झाली आहे. लिउ यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर निर्बंध घातल्याने चीनवर पुन्हा एकदा जोरदार टीका होत आहे.